भूकंपाने नेपाळ पुन्हा हादरले;१४० लोकांचा मृत्यू, १५० पेक्षा अधिक जखमी

नेपाळमध्येच नव्हे तर नवी दिल्ली, बिहार, झारखंड या भारतातील राज्यांमध्येही भूकंपाचा धक्का बसला आहे.
भूकंपाने नेपाळ पुन्हा हादरले;१४० लोकांचा मृत्यू, १५० पेक्षा अधिक जखमी

काठमांडू : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या भूकंपाच्या जोरदार हादऱ्यामध्ये किमान १४० लोक ठार झाले असून १५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत, तर शेकडो घरे जमीनदोस्त झाली आहेत. २०१५ नंतर नेपाळमध्ये बसलेला हा सर्वात मोठा भूकंप आहे. २०१५ साली झालेल्या भूकंपामध्ये सुमारे ९००० जण मरण पावले होते व २२ हजारांपेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.

शुक्रवारी रात्री ११.४७ वाजता झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने काठमांडू आणि सभोवतालचे जिल्हे हादरले. केवळ नेपाळमध्येच नव्हे तर नवी दिल्ली, बिहार, झारखंड या भारतातील राज्यांमध्येही भूकंपाचा धक्का बसला आहे. नेपाळच्या लष्कराने मदतकार्य त्वरेने सुरू केले असल्याची माहिती नेपाळच्या लष्कराचे प्रवक्ते कृष्णप्रसाद भंडारी यांनी दिली.

नेपाळमधील जाजरकोट आणि रुकुम या पश्चिम नेपाळमधील जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का अधिक बसला असून लष्कराचे जवान आता भूकंपात कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्यांना उपसून त्याखाली अडकलेल्यांची सुटका करण्याचे काम करीत आहेत, तसेच मृतदेहही बाहेर काढत आहेत. आतापर्यंत १४० नागरिक मरण पावले असल्याची माहिती नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. नालगड महापालिकेच्या उपमहापौर सरिता सिंह यांचाही मृतांमध्ये समावेश आहे.

शुक्रवारी रात्री झालेल्या भूकंपानंतरही १५९ भूकंपोत्तर धक्के बसले असून काठमांडूपासून ५०० किलोमीटर पश्चिमेला भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे राष्ट्रीय भूकंप नियंत्रण आणि संशोधन केंद्राने सांगितले आहे. मुख्य भूकंपानंतर मध्यरात्री १२.०८ वा. ४.५ रिश्चर क्षमतेचा, १२.२९ वा. ४.२ रिश्चर क्षमतेचा, तर १२.३५ वा ४.३ रिश्चर क्षमतेचा व पहाटे ४.१६ वा. ४.६ रिश्चर क्षमतेचे हादरे नोंद केले गेले.

रात्रीच्या भूकंपानंतर नागरिकांनी कोसळलेल्या आपापल्या घरांचे ढिगारे उपसण्यास सुरुवात करून अडकलेल्या लोकांच्या सुटकेचे प्रयत्न केले होते. पंतप्रधान पुष्पकमल दहाल प्रेमचंड यांनी शनिवारी लगेच भूकंपग्रस्त भागाला भेट दिली. त्यांच्यासोबतही वैद्यकीय मदत पथक होते. त्यांनी माहिती घेत व नुकसानाचा अंदाज घेत मुख्य जिल्हा अधिकाऱ्यांबरोबर पाहणी केली. नंतर सुरखेत येथे ते परतले. त्यावेळी त्यांनी आपल्याबरोबर सात जखमी व त्यांच्या कुटुंबीयांनाही आणले. या भूकंपामधील प्राणहानी आणि वित्तहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

नेपाळी लष्कर आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू केले आहे. जखमींवर सुरखेत जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. भूकंपामुळे रस्ते संपर्कही काही ठिकाणी तुटला असून तोही तातडीने पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारी अधिकाऱ्यांना भूकंपग्रस्तांना मदतीसाठी १०० दशलक्ष रुपये तातडीने देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. गृहमंत्रालयाने अतिरिक्त ५.५ दशलक्ष रुपयांची मदत जाजरकोट आणि रुकुम जिल्ह्यातील आपत्कालीन मदतनिधीला देण्याचे घोषित केले आहे.

दिल्ली व बिहारमध्येही भूकंपाचे धक्के

नेपाळला शुक्रवारी रात्री भूकंपाचा मोठा धक्का बसल्यानंतर तसेच जोरदार धक्के भारतात दिल्ली व बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्येही बसले, मात्र बिहारमध्ये कोणतीही वित्त वा प्राणहानी झाल्याचे वृत्त नाही. बिहारमधील पाटणा, कटिहार, पूर्व व पश्चिम चंपारण, दरभंगा, मुजफ्फरपूर, सासाराम, नावडा आणि भारत-नेपाळ सीमेवरील अनेक भागांत भूकंप जाणवला.

नेपाळी काँग्रेसची मदत

नेपाळी काँग्रेस पक्षाने सरकारला ५ दशलक्ष रुपयांची मदत देण्याचे घोषित केले आहे. तसेच आरोग्य आणि लोकसंख्या मंत्री मोहन बहादूर बस्नेत यांनी भूकंपग्रस्तांना विनामूल्य उपचार करण्याचे घोषित केले आहे.

भूकंपासाठी संवेदनशील भाग

नेपाळ हा तिबेट व भारतीय टायटॅनिक भागातील भूकंप संवेदनशील भाग असून त्यामुळे नेपाळमध्ये भूकंप होणे ही बाब नवीन नाही.

नेपाळमध्ये अलीकडे झालेले भूकंप

१६ ऑक्टोबर सुदूर पश्चिम प्रांतात ४.८ रिश्चर क्षमतेचा भूकंप

२२ ऑक्टोबर काठमांडू शहराला धक्का, ६.१ रिश्चर क्षमतेचा भूकंप

३ ऑक्टोबर काठमांडूला ३ रिश्चर क्षमतेचा धक्का.

२०१५ मधील भीषण भूकंप

८ लाखांपेक्षा अधिक घरे जमीनदोस्त वा त्यांचे नुकसान

पश्चिम व मध्य नेपाळमधील अनेक भागांना धक्के

अनेक ऐतिहासिक स्थानांचे मोठे नुकसान

गावेच्या गावेही पडली होती ओस

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सहसंवेदना

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या नेपाळमधील भूकंपाच्या या भीषण धक्क्याबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. नेपाळच्या लोकांबरोबर भारत उभा असून सर्व शक्य ती मदत करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी इच्छाही त्यांनी एक्सवर पोस्ट करून व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in