

राजकोट : गुजरातमधील राजकोट आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू सौराष्ट्रातील गोंडलपासून २४ किमी पश्चिम नैर्ऋत्येस होता. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या वृत्तानुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ इतकी नोंदवली गेली. राजकोट आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.
अनेकांनी त्यांच्या घरात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती दिली. भूकंपाच्या या धक्क्यामुळे जनतेत घबराट पसरली होती. सुदैवाने जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीचे कोणतेही वृत्त नाही. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सतर्क झाली आहेत. गुजरात सरकारने लोकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही असामान्य परिस्थितीची त्वरित स्थानिक प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
व्हिडीओ व्हायरल
राजकोट शहर, गोंडल, जसदान, धोराजी आणि आसपासच्या ग्रामीण भागात भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवले. लोक त्यांच्या घरांमधून, कार्यालयांमधून आणि आस्थापनांमधून बाहेर धावत सुटले. लोकांनी सोशल मीडियावर खुर्च्या आणि पंखे थरथरताना दाखवणारे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. गुजरातमधील सौराष्ट्र हा प्रदेश भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय झोन ३ मध्ये येतो, जेथे वेळोवेळी सौम्य भूकंप होतात.
गुजरातमधील भूज येथे २००२ मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर, कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये ३ ते ४ रिश्टर स्केलचे अनेक भूकंप नोंदवले गेले आहेत, परंतु कोणतेही नुकसान झालेले नाही. यापूर्वी, राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने १७ ऑक्टोबर रोजी भरूचजवळ २.६ रिश्टर स्केलची अत्यंत सौम्य भूकंपीय गतिविधी नोंदवली होती. या वर्षी गुजरात आणि आसपास १४ हून अधिक भूकंपांची नोंद झाली आहे, त्यापैकी बहुतेक भूकंप ३-४ रिश्टर स्केलचे होते.