
बुधवारी पहाटे नेपाळमध्ये ६.६ रिश्टर स्केलचा भूकंप आला. यामुळे तब्बल ६ जणांचा मृत्यू झाला असून डोटी जिल्ह्यात काही घरेदेखील कोसळली. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की, दिल्लीमध्येही याचे हादरे बसले. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, ९ नोव्हेंबरला रात्री १ वाजून ५७ मिनिटांच्या सुमारास भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र नेपाळमधील मणिपूर हे होते. त्याची खोली जमिनीच्या खाली १० किमी होती. याआधी ८ नोव्हेंबरला रात्री ९ वाजताही भूकंपाचे धक्के जाणवले होते. तर मिझोराम येथे रात्री १२ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.४ होती.
नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोटी जिल्ह्यात घरे कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत. भूकंपग्रस्त भागात शोध आणि बचाव कार्यासाठी नेपाळ लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. तसेच, दिल्लीसह यूपी, बिहार, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये भूकंपाचा हादरा बसला. काही लोकांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअरही केले आहेत. यापूर्वी १९ ऑक्टोबरला काठमांडूला ५.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला होता.