पूर्व, दक्षिण भारतात भाजपच्या जागा वाढणार; रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा अंदाज

तेलंगणामध्ये भाजप हा प्रथम किंवा दुसऱ्या क्रमांकावर असेल आणि ही मोठी गोष्ट आहे. ओदिशामध्ये ते क्रमांक एकवर असतील, तर तामिळनाडूमध्ये भाजपची मतांची टक्केवारी दोन अंकी असेल, असेही किशोर यांनी म्हटले आहे.
पूर्व, दक्षिण भारतात भाजपच्या जागा वाढणार; रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा अंदाज
Published on

नवी दिल्ली : पूर्व आणि दक्षिण भारतात यावेळी भाजपच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढणार असल्याच्या भाजपच्या दाव्यावर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शिक्कामोर्तब केले आहे. सध्या कर्नाटक वगळता या दोन प्रदेशांमध्ये भाजपचे अस्तित्व दुर्बल ते नगण्य असे आहे.

तेलंगणामध्ये भाजप हा प्रथम किंवा दुसऱ्या क्रमांकावर असेल आणि ही मोठी गोष्ट आहे. ओदिशामध्ये ते क्रमांक एकवर असतील, तर तामिळनाडूमध्ये भाजपची मतांची टक्केवारी दोन अंकी असेल, असेही किशोर यांनी म्हटले आहे. तेलंगणा, ओदिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरळ ही राज्ये मिळून एकूण २०४ जागा आहेत, परंतु भाजपला या राज्यांमध्ये मिळून ५० च्या वरही जागा मिळणार नाहीत. इतकेच नव्हे तर भाजपने ३७० जागांचे लक्ष्य ठरविले असून त्यांना तेही गाठता येणार नाही, असेही किशोर म्हणाले.

...तर राहुल गांधी यांनी बाजूला व्हावे!

लोकसभा निवडणुकीत इच्छित निकाल आले नाहीत, तर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी बाजूला व्हावे, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. राहुल गांधी व्यावहारिकपणे पक्ष चालवत आहेत. त्यामुळे ते स्वत: बाजूला होऊ शकले नाहीत, अथवा पक्षाचा कारभार अन्य कोणकडे सोपवू शकले नाहीत, हे लोकशाहीविरोधी वाटत असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले. काँग्रेस पक्ष पुनरुज्जीवित करण्याची योजना किशोर यांनी आखली होती. मात्र, या रणनीतीची अंमलबजावणी करण्याबाबत किशोर आणि पक्षाच्या नेतृत्वाचे न पटल्याने प्रशांत किशोर बाजूला झाले. कोणत्याही यशाविनाच तुम्ही गेल्या १० वर्षांपासून तेच काम करीत आहात. त्यामुळे थोडा काळ दूर राहण्यात काहीच हानी नाही. तुम्ही किमान पाच वर्षे ही जबाबदारी अन्य नेत्याकडे सोपविली पाहिजे, तुमच्या मातोश्रींनी ते केले. राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर सोनिया गांधी राजकारणापासून दूर राहिल्या होत्या, असे किशोर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in