

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने रविवारी देशातील पाच राज्यांसाठी विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची घोषणाही करण्यात आली आहे.
तमिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. पश्चिम बंगालमध्ये मतदान दोन टप्प्यांत २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी मतदान पार पडेल. केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या तीन राज्यांमध्ये ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येईल. सर्व पाचही राज्ये आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांचे निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर होतील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पश्चिम बंगालमध्ये एकूण २९४, तमिळनाडूत २३४, केरळमध्ये १४०, आसाममध्ये १२६ आणि पुद्दुचेरीमध्ये ३० अशा एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात (१५२ जागा) ३० मार्चला अधिसूचना येईल, ६ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील आणि २३ एप्रिलला मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात (१४२ जागा) २ एप्रिलला अधिसूचना निघेल, ९ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील आणि २९ एप्रिलला मतदान होईल. दोन्ही टप्प्यांसाठी अर्जांची छाननी अनुक्रमे ७ आणि १० एप्रिलला होईल, तर निकाल ४ मे रोजी एकत्रितपणे जाहीर केला जाईल.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, आसाम, केरळम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये एकूण १७.४ कोटी मतदार आणि ८२४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे २.१९ लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून साधारण २५ लाख कर्मचारी निवडणूक कामात तैनात केले जातील. आसाम विधानसभेची मुदत २० मे, केरळची २३ मे, पुद्दुचेरीची १५ जून, तामिळनाडूची १० मे आणि पश्चिम बंगाल विधानसभेची मुदत ७ मे रोजी संपत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अंतिम यादीनुसार आसाममध्ये सुमारे २.२५ कोटी, केरळममध्ये २.७ कोटी, पुद्दुचेरीमध्ये ९.४४ लाख आणि तामिळनाडूमध्ये ५.६७ कोटी मतदार आहेत; तसेच २८ फेब्रुवारीच्या अंतिम यादीनुसार पश्चिम बंगालमध्ये ६.४४ कोटी मतदार असून, माननीय न्यायाधीशांच्या निर्णयानुसार जी काही अतिरिक्त (पुरवणी) यादी येईल, ती यामध्ये नंतर समाविष्ट केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घोषणेसह, या पाचही राज्यांमध्ये ‘आचारसंहिता’ तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. २०२१ मध्ये, या पाचही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्यावेळी, बंगालमधील निवडणुका आठ टप्प्यांत पार पडल्या होत्या, तर आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान झाले होते; तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये मात्र एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आले होते.
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की, भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२६ अन्वये निवडणूक आयोगावर पात्र व्यक्तींचा, विशेषतः १८ वर्षे वय पूर्ण झालेल्या भारतीय नागरिकांचा मतदार यादीत समावेश करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता आचारसंहिता लागू झाली असल्याने, कोणत्याही राज्य सरकारला कोणत्याही प्रकारच्या नवीन घोषणा करण्यास परवानगी नाही.
मतदान केंद्रांवर १०० टक्के वेबकास्टिंगची सुविधा
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि देखरेख वाढवण्यासाठी, २०२६ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील सर्व मतदान केंद्रांवर आयोग १०० टक्के वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देईल.
पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी - मुख्यमंत्री
बारामती आणि राहुरी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच आमची इच्छा आहे, त्यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा. पण जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढवणार - तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारच बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नसल्याची चर्चा आहे. राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते.
बारामती, राहुरीमध्ये विधानसभा पोटनिवडणूक
केंद्रीय निवडणूक आयोगाने गोवा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड, त्रिपुरा राज्यातील पोटनिवडणुकांची देखील घोषणा केली. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच ४ मे रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. ३० मार्च २०२६ रोजी या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचेही काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.
ओपिनियन पोलनुसार बंगालमध्ये ममता सरकार
निवडणूक आयोगाने आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर केल्यानंतर सर्वे एजन्सी मॅट्रिझ-आयएएनएसने ओपिनियन पोल (जनमत चाचणी) प्रसिद्ध केला आहे. या सर्वेक्षणानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा टीएमसीचे सरकार येऊ शकते, तर आसाममध्ये भाजपचे सरकार कायम राहण्याचा अंदाज आहे. तमिळनाडूच्या २३१ जागांपैकी सर्वेक्षणानुसार द्रमुकला १०४-११४ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर अद्रमुक-भाजप युतीला ११४-१२७ जागा मिळू शकतात, तर केरळमध्येही डावे पक्ष आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ यांच्यात कांटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगाल
एकूण जागा - २९४
मतदान पहिला टप्पा - २३ एप्रिल
दुसरा टप्पा - २९ एप्रिल
मतमोजणी - ४ मे
तमिळनाडू
एकूण जागा - २३४
मतदान - २३ एप्रिल
मतमोजणी - ४ मे
केरळ
एकूण जागा - १४०
मतदान - ९ एप्रिल
मतमोजणी - ४ मे
आसाम
एकूण जागा - १२६
मतदान - ९ एप्रिल
मतमोजणी - ४ मे
पुद्दुचेरी
एकूण जागा - ३०
मतदान - ९ एप्रिल
मतमोजणी - ४ मे
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल?
निवडणुकीसाठीची अधिसूचना : ३० मार्च २०२६
उमेदवारी अर्ज दाखल : ६ एप्रिल २०२६
अर्ज छाननी : ७ एप्रिल २०२६
अर्ज मागे घेण्याची तारीख : ९ एप्रिल २०२६
मतदान : २३ एप्रिल २०२६
मतमोजणी : ४ मे २०२६