

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीत हेराफेरी झाल्याचा आरोप करत 'मतचोरी'सारखे शब्द वापरल्यानंतर निवडणूक आयोगाने (ईसीआय) त्यांना कठोर इशारा दिला आहे. जर कोणाकडे एखाद्या व्यक्तीने दोनदा मतदान केल्याचा पुरावा असेल, तर तो प्रतिज्ञापत्रासह निवडणूक आयोगाकडे सादर करावा. पुरावे न देता निवडून आलेल्या प्रतिनिधींना 'चोर' म्हणणे चुकीचे असून, त्यामुळे भारताच्या निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो, असे आयोगाने म्हटले आहे.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, 'एक व्यक्ती, एक मत' हे तत्त्व भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून लागू आहे आणि हे नवीन नाही. गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात आयोगाने म्हटले आहे की,, 'मत चोरी'सारखे घाणेरडे शब्द वापरणे म्हणजे केवळ कोट्यवधी भारतीय मतदारांचा नाही, तर लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर हल्ला आहे.
लेखी प्रतिज्ञापत्र द्या
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतेच महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात २०२४ च्या निवडणुकीत एक लाखाहून अधिक मते 'चोरली' गेल्याचा आरोप केला होता. त्यांनी दावा केला की, यामुळे काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला. त्यावर प्रतिक्रिया देताना आयोगाने त्यांना त्यांच्या आरोपांबाबत लेखी प्रतिज्ञापत्रासह पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.