भारत-सौदी यांच्यात आर्थिक आणि गुंतवणूक समितीची बैठक होणार

दोन्ही मंत्री या बैठकीत आर्थिक आणि गुंतवणूक समितीच्या विविध संयुक्त गटांच्या कार्याच्या प्रगतीवर चर्चा करतील
भारत-सौदी यांच्यात आर्थिक आणि गुंतवणूक समितीची बैठक होणार

सौदी अरेबिया येथे होणाऱ्या आर्थिक आणि गुंतवणूक समितीच्या मंत्रीस्तरीय बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल सहभागी होत आहेत. १८ आणि १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या बैठकीत सौदी अरेबियाचे ऊर्जामंत्री राजपुत्र अब्दुल अझीझबिन सलमान यांच्यासह पीयूष गोयल बैठकीच्या उद्घाटन समारंभाचे सहअध्यक्ष पद भूषवतील. ही मंत्रीस्तरीय समिती भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या आराखड्यांतर्गत स्थापन केलेल्या दोन मंत्रीस्तरीय कार्यक्षेत्रांपैकी एक असून, त्याचे सर्वोच्च स्तरावरील नेतृत्व भारताचे पंतप्रधान आणि सौदी अरेबियाचे राजपुत्र यांच्याकडे आहे.

दोन्ही मंत्री या बैठकीत आर्थिक आणि गुंतवणूक समितीच्या विविध संयुक्त गटांच्या कार्याच्या प्रगतीवर चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे. पश्चिम किनाऱ्‍यावरील रिफायनरी प्रकल्प, ट्रान्स-ओशन ग्रीड कनेक्टिव्हिटी, हरित हायड्रोजन, अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा आणि औषधनिर्माण यांसारख्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये आणि प्रकल्पांमध्ये द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी दोन्ही बाजूंनी कृती योजना तयार होणे अपेक्षित आहे; तसेच युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी फेब्रुवारी २०१९मध्ये आपल्या भारत भेटीदरम्यान भारतात १०० अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती, त्या गुंतवणुकीला गती देण्याबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे.

या भेटीदरम्यान पीयूष गोयल, सौदी अरेबियाचे वाणिज्यमंत्री डॉ. माजिद बिन अब्दुल्ला अल्कासाबी यांची भेट घेणार आहेत. हे नेते दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांच्या विस्तारावर व्यापक चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे.

सौदी भारताचा चौथा सर्वात मोठा भागीदार

भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध हे सर्व प्रमुख सहकार्य क्षेत्रांचा समावेश असलेल्या दूरदर्शी धोरणात्मक भागीदारीद्वारे परिभाषित केले जातात. आर्थिक संबंध हा या भागीदारीचा प्रमुख स्तंभ आहे. भारत हा सौदी अरेबियाचा दुसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे, तर सौदी अरेबिया हा भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. भारताच्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक देश असलेल्या सौदी अरेबियाच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील गतिमान आणि सतत वाढत असलेल्या धोरणात्मक भागीदारीला आणखी चालना मिळेल आणि सहकार्याच्या नवीन क्षेत्रांचा मार्ग मोकळा होईल, ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यावसायिक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ होतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in