भाजपप्रणीत केंद्र सरकारचा आर्थिक दहशतवाद; काँग्रेसची टीका

काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल म्हणाले की, ही कृती लोकशाही तत्त्वे आणि मूल्यांवर हल्ला आहे. विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे.
भाजपप्रणीत केंद्र सरकारचा आर्थिक दहशतवाद; काँग्रेसची टीका

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आर्थिकदृष्ट्या विकलांग करण्यासाठी केंद्र सरकारने पक्षाच्या खात्यातून ६५ कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप करतानाच, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आमच्याविरोधात आर्थिक दहशतवाद पुकारला असल्याचा दावा काँग्रेसने आज केला आहे.

सत्ताधारी पक्ष लोकशाहीची हत्या करून देशाला ‘हुकूमशाही राज’कडे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आपल्याविरोधात ‘कर दहशतवादी हल्ला’ केला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल आणि अजय माकन यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत केला. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस प्रभारी जयराम रमेश म्हणाले की, दहशतवादी हल्ले केले जात आहेत. काँग्रेसला आर्थिकदृष्ट्या खिळखिळे बनवण्याचे षड‌्यंत्र रचले जात आहे. हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न आहे. वाढती महागाई, शेतकऱ्यांचे आंदोलन आणि भारत जोडो न्याय यात्रा यामुळे भाजप सरकार हादरून गेल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे.

अजय माकन म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आयकर विभागामार्फत त्यांच्या खात्यातून सुमारे ६५ कोटी रुपये लुटले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला निवडणूक लढवता येणार नाही. म्हणून आर्थिकदृष्ट्या पंगू करण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. भाजप सरकारने प्रमुख विरोधी पक्षाविरुद्ध ‘आर्थिक दहशतवाद’ सुरू केला आहे, असा आरोप त्यांनी केला. पक्षाच्या वेगवेगळ्या पाच खात्यांमधून हे पैसे काढण्यात आले आहेत, असा दावा त्यांनी केला.

काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल म्हणाले की, ही कृती लोकशाही तत्त्वे आणि मूल्यांवर हल्ला आहे. विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. अशा प्रकारचा खालच्या स्तरावरील हल्ला इतिहासात कधीच घडला नाही. आम्ही त्याचा सामना करू, हे स्पष्टपणे हुकूमशाहीचे उदाहरण आहे. भाजप जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला 'हुकूमशाही राज'कडे नेत आहे. भाजपने कधी इन्कम टॅक्स भरला आहे का, असा सवाल माकन यांनी केला. आपल्या देशात लोकशाही आहे का? लेव्हल प्लेइंग फिल्ड आहे का? असा सवालही त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in