
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कच्च्या तेलाच्या दरात घट झालेली आहे. तरीही सर्वसामान्य लोकांना सरकारने दिलासा दिलेला नाही. यावर तेल मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, जागतिक तेल बाजारात चढ-उतार होत असतानाही भारताने इंधनाचे दर किफायतशीर ठेवले आहेत. जगातील अनेक देशांमध्ये दोन वर्षांत तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तरीही भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात अत्यंत तुरळक दरवाढ केली, असे ते म्हणाले.
रशियाकडून भारताला स्वस्तात तेल मिळत आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी करणार का? यावर ते म्हणाले की, आता रशियाकडून तेलावर मोठी सवलत मिळत नाही. युक्रेन-रशिया युद्धाच्या सुरुवातीला चांगली सवलत मिळत होती. आता त्यांनी तेलाची दरवाढ केली. आता जास्त सवलतीत तेल मिळत नाही.
जून २०२१ ते जून २०२३ दरम्यान, भारतात पेट्रोलच्या दरात २.३६ टक्के वाढ झाली. याच काळात पाकिस्तानात ५०.८३ टक्के, बांगलादेशात ३०.११ टक्के, श्रीलंकेत ७९.६१ टक्के, नेपाळला ४२.३९ टक्के इंधनाचे दर वाढले. अमेरिकेत ३०.१५ टक्के, फ्रान्समध्ये २२.६७ टक्के, जर्मनीत १९.०८ टक्के, इटलीत १४.६८ टक्के, स्पेनमध्ये १७ टक्के, ब्रिटनमध्ये १०.९३ टक्के, तर कॅनडात २४.१७ टक्के दरवाढ झाली, असे ते म्हणाले.
तेलाच्या दरात पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द नजर ठेवून आहेत. सरकारने दोन वेळा पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर कमी केला. भाजपशासित राज्यांनी व्हॅट कमी केला. मात्र, विरोधी पक्षाच्या राज्यांनी व्हॅट कमी केला नाही, असा आरोप त्यांनी केला.
पुरी म्हणाले की, जुलैमध्ये गुवाहाटीत ९८ रुपये पेट्रोल होते, तर तृणमूलचे राज्य असलेल्या प. बंगालमध्ये कोलकात्यात १०६.०३ रुपयांनी पेट्रोल मिळत होते. लखनऊमध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये, तर बंगळुरूत त्याची किंमत १०१.९४ रुपये होती.
पेट्रोल, डिझेल कमी होणार नाहीत
तेल मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे साफ संकेत मिळत आहेत की, पेट्रोल-डिझेलचे दर सध्या तरी कमी होणार नाहीत. सध्या सरकारी पेट्रोलियम कंपन्यांना पेट्रोल-डिझेल विकताना ८ ते १० रुपये लिटरमागे नफा होत आहे.