ED ने ‘बीआरएस’ नेत्या कविता यांना केली अटक; चौकशीसाठी दिल्लीला आणले

ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी कविता यांच्या हैदराबादमधील निवासस्थानी छापा टाकला आणि नंतर त्यांना अटक केली.
ED ने ‘बीआरएस’ नेत्या कविता यांना केली अटक; चौकशीसाठी दिल्लीला आणले

हैदराबाद : दिल्ली सरकारच्या अबकारी धोरण घोटाळ्यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी हैदराबादमध्ये भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांना अटक केली आणि त्यांना चौकशीसाठी दिल्लीत आणले.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी कविता यांच्या हैदराबादमधील निवासस्थानी छापा टाकला आणि नंतर त्यांना अटक केली. बीआरएस नेते आणि तेलंगणाचे माजी मंत्री वेमुला प्रशांत रेड्डी यांनी दावा केला की, कविता यांना अटक करण्यात आली आणि रात्री पावणेनऊ वाजता विमानाने दिल्लीला नेण्यात आले. ही कृती पूर्वनियोजित असल्याचा आरोप त्यांनी केला आणि ते याला विरोध करणार असल्याचे सांगितले. बीआरएसचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव, माजी मंत्री हरीश राव आणि मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते कविता यांच्या निवासस्थानी जमले आणि घोषणाबाजी केली.

अंमलबजावणी संचालनालयाने दावा केला होता की, दिल्ली उत्पादन शुल्क धोरणांतर्गत मोठी भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत असलेल्या मद्य व्यापाऱ्यांच्या लॉबीशी कविता यांचा संबंध आहे. या प्रकरणातील एक आरोपी विजय नायर याने साउथ ग्रुपकडून कडून किमान १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. साऊथ ग्रुप या उद्योगसमूहावर सरथ रेड्डी, के. कविता आणि मागुंता श्रीनिवासुलु रेड्डी यांचे कथितरीत्या नियंत्रण आहे.

logo
marathi.freepressjournal.in