बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या छाप्यात मोठे घबाड हाती लागले. कोट्यवधी रुपयांच्या जडजवाहिऱ्यांसह १२ कोटी रुपयांची रोकड, एक कोटी रुपये परकीय चलन, अनेक किलो सोने-चांदी आणि मर्सिडीज गाडी मिळाली आहे. वीरेंद्र यांना मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली आहे.
यासंदर्भात तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या बंगळुरू प्रादेशिक कार्यालयाने २२ आणि २३ ऑगस्टला गंगटोक, चित्रदुर्ग जिल्हा, बंगळुरू शहर, हुबळी, जोधपूर, मुंबई आणि गोव्यासह देशात ३१ ठिकाणी छापे टाकले. महत्त्वाचे म्हणजे, यात ५ कॅसिनोंचाही समावेश आहे. ही शोधमोहीम चित्रदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र आणि इतरांविरुद्ध बेकायदेशीर ऑनलाइन आणि ऑफलाइन बेटिंगच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या खटल्यांशी संबंधित आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किंग ५६७, राजा ५६७, पपीज ००३ आणि रत्ना गेमिंग यासारख्या नावाने अनेक ऑनलाइन सट्टेबाजी साइट्स चालवत होता.
याशिवाय, आरोपीचा भाऊ, केसी थिप्पेस्वामी हा दुबईतून, डायमंड सॉफ्टेक, टीआरएस टेक्नॉलॉजीज, प्राइम ९ टेक्नॉलॉजीज या ३ व्यावसायिक संस्था चालवतो. या संस्था केसी वीरेंद्रच्या कॉलसेंटर सर्व्हिस आणि गेमिंग संचालनाशी संबंधित आहे.
किती घबाड
या कारवाईत जवळपास १ कोटी रुपयांच्या परदेशी चलनासह सुमारे १२ कोटी रुपये रोख, जवळपास ६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, सुमारे १० किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि मर्सिडीजसह चार वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच, १७ बँक खाती आणि २ बँक लॉकर्सदेखील गोठवण्यात आले आहेत. याशिवाय, केसी वीरेंद्र याचा भाऊ केसी नागराज आणि त्याचा मुलगा पृथ्वी एन. राज याच्या ठिकाणांवरून मालमत्तांशी संबंधित काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. याबरोबर काही आक्षेपार्ह दस्तावेजही जप्त करण्यात आले.