कर्नाटकात काँग्रेस खासदार, तीन आमदारांच्या मालमत्तांवर धाडी; मनी लाँड्रिंगप्रकरणी ED ची छापेमारी

काँग्रेसचे बेल्लारीचे खासदार ई. तुकाराम आणि तीन आमदारांच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी छापे टाकले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

बंगळुरू : काँग्रेसचे बेल्लारीचे खासदार ई. तुकाराम आणि तीन आमदारांच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी छापे टाकले. कथित वाल्मिकी घोटाळ्यासंबंधित ही कारवाई करण्यात आली.

‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत बेल्लारीतील पाच आणि बंगळुरूमधील तीन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. छाप्यांमध्ये खासदार तुकाराम तसेच आमदार नारा भारत रेड्डी (बेल्लारी शहर), जे. एन. गणेश (कंपळी) आणि एन. टी. श्रीनिवास (कुडलिगी) यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. कर्नाटकमधील महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातून मोठ्या प्रमाणावर निधी वळवून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना पैसे वाटण्यासाठी त्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.

महामंडळाची स्थापना २००६ मध्ये अनुसूचित जमातींना सामाजिक व आर्थिक विकासाच्या योजना राबवण्यासाठी झाली होती. मात्र, २१ मे २०२३ रोजी महामंडळातील लेखा अधीक्षक चंद्रशेखरन पी. यांचा मृतदेह सापडल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत निधीच्या बेकायदेशीर हस्तांतरणाचा उल्लेख केला होता. या प्रकरणात कर्नाटकमधील तत्कालीन आदिवासी मंत्री बी. नागेंद्र आणि त्यांच्याशी संबंधित पाच जणांना ईडीने अटक केली होती.

बेल्लारी ग्रामीणमधील आमदार असलेल्या नागेंद्र यांनी आरोपांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे की, नागेंद्र यांचे दोन वैयक्तिक सहाय्यक आणि एक सहकारी यांनी निवडणुकीच्या खर्चासाठी मोठ्या प्रमाणावर रक्कम हाताळल्याची कबुली दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in