कॅनरा बँकेच्या फसवणूक प्रकरणी २.८६ कोटींची मालमत्ता जप्त

गोव्यातील कॅनरा बँक फसवणुकीच्या प्रकरणात प्रवर्तन संचालनालयाने (ED) पणजी विभागीय कार्यालयामार्फत दक्षिण गोव्यातील तब्बल २.८६ कोटी रुपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत.
कॅनरा बँकेच्या फसवणूक प्रकरणी २.८६ कोटींची मालमत्ता जप्त
Published on

आशिष सिंह/मुंबईः गोव्यातील कॅनरा बँक फसवणुकीच्या प्रकरणात प्रवर्तन संचालनालयाने (ED) पणजी विभागीय कार्यालयामार्फत दक्षिण गोव्यातील तब्बल २.८६ कोटी रुपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई २८ ऑगस्ट रोजीच्या आदेशाद्वारे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत करण्यात आल्याचे केंद्रिय यंत्रणेने शुक्रवारी सांगितले.

जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये धरबांदोरा येथे रियाझ शेख यांच्या मालकीची २२ भूखंड, कुणकोलीममधील दोन भूखंड आणि फातोर्डा येथील भागीदार आदित्य आंगल यांच्याशी संबंधित निवासी व्हिला यांचा समावेश आहे. या मालमत्ता बेकायदेशीर निधी वापरून खरेदी करण्यात आल्या असून त्या गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेच्या समकक्ष असल्याचे ईडीने म्हटले आहे.

सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने (गोवा) एम/एस क्राउन मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन आणि त्याच्या भागीदारांविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर ही कारवाई झाली आहे. ईडीच्या मते, आरोपींनी कॅनरा बँकेकडून तब्बल सात कोटी रुपयांचे कर्ज फसवणुकीने घेतले आणि त्याची परतफेड केली नाही.

ईडीच्या चौकशीत उघड झाले की, सीएमटीसीच्या भागीदारांनी कच्च्या लोखंडाच्या व्यापाराच्या नावाखाली हे कर्ज घेतले होते. मात्र त्यांनी आधीच इतर अनेक वित्तीय संस्थांकडे गहाण ठेवलेल्या मालमत्ता पुन्हा गहाण दाखवल्या. कर्जाची रक्कम मिळाल्यानंतर ती खोट्या व्यवहारांद्वारे भागीदारांच्या वैयक्तिक आणि स्वमालकीच्या खात्यांमध्ये वळवण्यात आली. "ही गुन्ह्यातून मिळालेली बेकायदेशीर रक्कम वैयक्तिक संपत्ती वाढवण्यासाठी आणि अतिरिक्त अचल मालमत्ता खरेदीसाठी वापरण्यात आली," असे यंत्रणेने म्हटले.

logo
marathi.freepressjournal.in