लोकांना मारझोड करुन खोटे जबाब नोंदवले जात आहेत; केजरीवाल यांचा गंभीर आरोप

चारही बाजूला भाजपचे लोक म्हणतात केजरीवाल यांना अटक केली जाईल. मला अटक केली जाईल हे भाजपच्या लोकांना कसे माहिती? कारण, भाजपच ईडी चालवत आहे. मला लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखणे, यासाठी हे सर्व सुरु आहे, असेही केजरीवाल म्हणाले.
लोकांना मारझोड करुन खोटे जबाब नोंदवले जात आहेत; केजरीवाल यांचा गंभीर आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मागील आठवड्यात चौथ्यांदा समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यावर केजरीवाल यांनी, "मी उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी नसल्याने मला समन्स का बजावण्यात आले", असा सवाल ईडीला केला. तसेच, लोकांना मारझोड करुन खोटे जबाब नोंदवले जात असल्याचा गंभीर आरोपही केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

"ईडीने मला चौथ्यांदा समन्स पाठवले होते. त्यांनी मला 18 किंवा 19 तारखेपैकी कधीही चौकशीला येण्यास सांगितले होते. मला पाठवण्यात आलेले चारही समन्स बेकायदेशीर आणि अवैध आहेत. हे समन्स का बेकायदेशीर आहेत, हे मी अनेकदा ईडीला लिहिले आहे. मात्र, त्यांनी याचे उत्तर दिले नाही", असे केजरीवाल म्हणाले.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरच समन्स का?

हे समन्स राजकीय हेतून पाठवले जात आहेत. ही चौकशी दोन वर्षापासून सुरु आहे. दोन वर्षात यांना काहीही मिळाले नाही. अनेक न्यायालयांनी यांना वारंवार विचारले की, किती पैश्यांची रिकव्हरी झाली? किती सोनं मिळाले? जमीनीचे कागद, रोकड मिळाली का? दोन वर्षांपासून ही चौकशी सुरु आहे. मग लोकसभा निवडणूक दोन महिन्यांवर असताना अचानक मला हे समन्स का आले?, असा सवालही केजरीवाल यांनी केला.

लोकसभेच्या प्रचारापासून रोखणे हाच हेतू-

चारही बाजूला भाजपचे लोक म्हणतात केजरीवाल यांना अटक केली जाईल. मला अटक केली जाईल हे भाजपच्या लोकांना कसे माहिती? कारण, भाजपच ईडी चालवत आहे. मला लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखणे, यासाठी हे सर्व सुरु आहे, असेही केजरीवाल म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in