मुंबई: ‘एज्युकेट गर्ल्स’ला मिळालेला रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असून, देशातील एका दुर्गम गावातील एका मुलीपासून सुरू झालेल्या लोकशक्तीवर आधारित चळवळीवर यामुळे जागतिक स्तरावर प्रकाशझोत पडला आहे, असे या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका सफिना हुसेन यांनी रविवारी सांगितले.
‘फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली’ या ‘एज्युकेट गर्ल्स’ म्हणून परिचित असलेल्या संस्थेला रॅमन मॅगसेसे पुरस्कार जिंकून इतिहास घडवला आहे. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय स्वयंसेवी संस्था ठरली आहे, असे मॅगसेसे पुरस्कार फाऊंडेशनच्या निवेदनात म्हटले आहे.
‘एज्युकेट गर्ल्स’ला आशियातील सर्वोच्च सन्मान मिळाला असून, "मुली व तरुण महिलांच्या शिक्षणाद्वारे सांस्कृतिक पूर्वग्रहांचा सामना करण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेसाठी, निरक्षरतेच्या जोखडातून त्यांची मुक्तता करण्यासाठी आणि त्यांना कौशल्य, धैर्य व आत्मविश्वास देऊन त्यांच्या संपूर्ण मानवी क्षमतेपर्यंत पोहोचण्यास सक्षम बनविण्यासाठी” हा पुरस्कार देण्यात आल्याचे मॅगसेसे पुरस्कार फाऊंडेशनने म्हटले.
हुसेन म्हणाल्या, “रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय स्वयंसेवी संस्था ठरणे हे ‘एज्युकेट गर्ल्स’साठी व देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे. या सन्मानामुळे भारतातील मुलींच्या शिक्षणासाठी लोकशक्तीवर आधारित चळवळीवर जागतिक प्रकाशझोत पडला आहे. एका दुर्गम गावातील एका मुलीपासून सुरू झालेली ही चळवळ अखेर संपूर्ण समुदायांचे रूपांतर घडवू लागली, परंपरा आव्हान देऊ लागली आणि विचारसरणीत बदल घडवू लागली.”
हा पुरस्कार टीम बालिका स्वयंसेवक, भागीदार, लिंग समतेसाठी काम करणारे उत्साही कार्यकर्ते व पाठीराखे यांना सन्मानित करतो तसेच आपले शिक्षणाचे हक्क परत मिळवलेल्या लाखो मुलींना मान्यता देतो, असेही त्या म्हणाल्या.
राजस्थानपासून सुरुवात करून, ‘एज्युकेट गर्ल्स’ने शिक्षणाच्या दृष्टीने सर्वाधिक गरजू समुदाय ओळखले, शाळेत नसलेल्या मुलींना शाळेत आणले आणि त्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक पात्रता आणि रोजगारक्षमतेपर्यंत टिकून राहतील यासाठी प्रयत्न केले, असे निवेदनात म्हटले आहे.
एक कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार -हुसेन
येत्या दशकात आम्ही एक कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम करणार असून ही कार्यपद्धती भारताबाहेरही शेअर करू. मुलगी शिकली की ती इतरांनाही पुढे घेऊन जाते आणि ही साधी गोष्ट आम्ही पुढे नेत आहोत,” हुसेन यांनी नमूद केले. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गायत्री नायर लोबो म्हणाल्या, “‘एज्युकेट गर्ल्स’मध्ये आम्ही शिक्षणाला विकासाचे सर्वोत्तम साधन मानतो.