आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा ;कतारच्या निकालाला आव्हान देण्याचा भारताचा इशारा

भारतीय युद्धनौकेचे नेतृत्व केले आहे. ते सध्या डेहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीस ॲॅण्ड कन्सल्टन्सीसाठी काम करत होते.
आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा ;कतारच्या निकालाला आव्हान देण्याचा भारताचा इशारा

नवी दिल्ली : भारतीय नौदलातील आठ माजी अधिकाऱ्यांना कतार येथील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या सर्वांवर हेरगिरीचा आरोप ठेवला आहे. या ८ अधिकाऱ्यांना ८ महिन्यांपूर्वी कतारमध्ये अटक केली होती. फाशीच्या निर्णयाने भारताला धक्का बसला असून या निकालाला कायदेशीर आव्हान देण्यात येईल, असे भारताने स्पष्ट केले आहे.

भारताच्या परराष्ट्र खात्याने सांगितले की, फाशीची शिक्षा ऐकून आम्ही सर्वजण हैराण झाले आहोत. आम्ही विस्तृत निकालाची वाट पाहत आहोत. आम्ही या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय व कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत. हे प्रकरण आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असून त्यावर आमचे लक्ष आहे. राजनीतिक संबंध व कायदेशीर मदत सुरूच राहील. आम्ही हे मुद्दे कतारच्या अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहोत. हे सर्व प्रकरण गुप्त असल्याने कोणतेही वक्तव्य करणे योग्य ठरणार नाही.

भारतीय सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, हे प्रकरण आता भारतीय यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करतील, मात्र कतार सरकारकडून कोणतीही नरमाईची भूमिका दिसत नाही. भारताच्या या माजी नौदल अधिकाऱ्यांना पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी फसवल्याचा संशय आहे.

इस्रायलसाठी हेरगिरीचा आरोप

हे सर्व अधिकारी नौदलात वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहेत. त्यांच्यावर इस्रायलसाठी हेरगिरीचा आरोप आहे. हे ८ जण प्रतिष्ठित अधिकारी आहेत. यांनी भारतीय युद्धनौकेचे नेतृत्व केले आहे. ते सध्या डेहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीस ॲॅण्ड कन्सल्टन्सीसाठी काम करत होते. ही खासगी कंपनी असून ती सशस्त्र दलांना प्रशिक्षण व अन्य सेवा पुरवते.

अशी आहेत नावे

कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदु तिवारी, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश, अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या सर्वांना हेरगिरीच्या आरोपाखाली चौकशीसाठी कतारमधील त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली होती. त्यांचे जामीन अर्ज सतत फेटाळून लावले. अखेर कतारच्या न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in