

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’वेळी पाकिस्तानने कुरापती सुरूच ठेवल्या असत्या तर भारतीय लष्कर पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या पूर्ण तयारीत होते, तसेच सीमेपार पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे आठ कॅम्प अद्यापही सक्रिय आहेत, यापैकी, सुमारे दोन आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे आणि सहा नियंत्रण रेषेच्या पलीकडे आहेत. आम्ही त्यांच्यावर बारीक नजर ठेवून आहोत आणि माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत. जर कोणताही प्रकार पुन्हा घडला तर सैन्य कारवाई केली जाईल, असा इशारा लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी दिला.
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असताना त्या ८८ तासांत मोठ्या प्रमाणात लष्कर सीमेवर हलवण्यात आले होते. पाकिस्तानने त्यावेळी काही दु:साहस केले असते, तर लष्कराने सैन्य कारवाई केली असती. ‘ऑपरेशन सिंदूर’वेळी जम्मू -काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर लष्कर मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराने जवळपास १०० पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. १० मे रोजी शस्त्रसंधी झाल्यानंतर जम्मू -काश्मीर मधील परिस्थिती नियंत्रणात आहे, भारतीय लष्कर सीमेवर अलर्ट मोडवर आहे, असे द्विवेदी म्हणाले.
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरुच
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू असल्याचा पुनरूच्चार यावेळी द्विवेदी यांनी केला. तसेच पाकिस्तानने काही कुरापती केल्या तर भारत त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल, असा इशाराही लष्करप्रमुखांनी दिला आहे. द्विवेदी म्हणाले की, २०२५ मध्ये ३१ दहशतवादी मारले गेले होते. त्यापैकी ६५ टक्के दहशतवादी पाकिस्तानी होते. त्यात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील स्थानिक सक्रिय दहशतवाद्यांचा आकडा आता एकअंकी आहे. दहशतवादी संघटनांना जाऊन मिळणाऱ्या स्थानिक तरूणांची संख्या शून्य असल्याचे ते म्हणाले.