

नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून शिंदेसेनेत (शिवसेना) दाखल झालेल्या ६ खासदारांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत त्या ५० मिनिटांच्या मॅरेथॉन बैठकीची माहिती दिली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार, महिला आरक्षण आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर अत्यंत सडेतोड उत्तरे दिली.
नुकतेच ठाकरे गटाचे ६ खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले आहेत. या प्रवेशानंतर, आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर शिंदे आणि या ६ खासदारांनी घेतलेली अमित शहा यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. याच सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामांवर चर्चा
अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. ही बैठक केवळ खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामांवर केंद्रित होती. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प, रेल्वे, रस्ते आणि पंतप्रधान आवास योजनांसारख्या विविध विकासकामांचे प्रस्ताव आणि पत्रे अमित शहा यांना देण्यात आली.
श्रीकांत शिंदेंवर समन्वयाची मोठी जबाबदारी
दिल्लीतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी समन्वय कुणाकडे असेल, यावर बोलताना शिंदे म्हणाले की, ‘स्वतः अमित शहा यांनी शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. जुने ७ आणि नवीन ६ अशा सर्व १३ खासदारांचे प्रश्न आणि प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांसोबत फॉलोअप करण्याचे काम आता डॉ. श्रीकांत शिंदे करतील’.