

पुणे : ‘ला निना’ प्रवाहामुळे देशात गेले दोन वर्षे देशात अत्यंत चांगला मान्सून झाला. त्यामुळे पीक व पाणी चांगले झाले. त्यामुळे पाण्याची चिंता नव्हती. २०२५ मधील अतिवृष्टी आणि कडाक्याच्या थंडीनंतर आता भारतीय हवामानावर 'एल निनो'चे सावट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि खाजगी हवामान संस्था स्कायमेट यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, २०२६ मध्ये एल निनो स्थिती विकसित होण्याची दाट शक्यता असून, यामुळे देशात सरासरीपेक्षा कमी मान्सूनचा धोका निर्माण झाला आहे. २०२६ मध्ये मान्सून कमकुवत किंवा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान असामान्यपणे वाढले की त्याला 'एल निनो' असे म्हटले जाते. ‘एल निनो’चा भारतीय मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार, २०२६ च्या सुरुवातीला ‘एल निना'चा प्रभाव संपल्यानंतर जुलै ते सप्टेंबर या मुख्य मान्सून काळात एल निनो स्थिती प्रबळ होऊ शकते. युरोपीय हवामान संस्थांनीही आपल्या विश्लेषणामध्ये २०२६ च्या उत्तरार्धात ‘एल निनो’ परतण्याचा इशारा दिला असून, यामुळे जागतिक तापमानातही वाढ होऊ शकते. भारताने यापूर्वी अनेक एल निनो वर्षांमध्ये गंभीर दुष्काळाचा सामना केला आहे.
अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम
भारतीय अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे मान्सूनवर अवलंबून असल्याने, पावसाच्या कमतरतेचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावर आणि ग्रामीण भागातील लोकांच्या उपजीविविकेवर होतो. कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास अन्नधान्य, कडधान्ये, भाज्या आणि खाद्यतेलाच्या किमती वाढून महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा मोठा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येईल, जिथे एफएमसीजी, दुचाकी आणि ट्रॅक्टर उत्पादक कंपन्या तसेच मायक्रोफायनान्स क्षेत्रातील कंपन्यांच्या विक्रीवर आणि वसुलीवर परिणाम होऊ शकतो. मात्र, आयटी , ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांना याचा थेट फटका बसण्याची शक्यता कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, जरी हे सुरुवातीचे संकेत असले तरी ते धोक्याची घंटा नसून एक महत्त्वाची पूर्वसूचना आहे. मान्सून कमकुवत राहिल्यास देशाच्या जीडीपी वाढीवर परिणाम होऊ शकतो आणि सरकारवर मदतीसाठी आर्थिक भार वाढू शकतो.