

नवी दिल्ली : ‘एल निनो’चा नवीन टप्पा अधिकृतपणे सुरू झाल्याने भारताच्या मान्सूनवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. परिणामी, खरिपाच्या महत्त्वपूर्ण हंगामात भात आणि मक्यासह पावसावर अवलंबून असलेल्या पिकांचे उत्पादन घटू शकते, असा इशारा अन्न आणि कृषी संघटनेने इशारा दिला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने म्हटले की, या हवामान बदलामुळे आधीच संकटात असलेल्या प्रदेशांमधील शेतीवर अवलंबून असलेली उपजीविका आणि अन्न सुरक्षेसाठी धोके वाढले आहेत.
आशियामध्ये, हा धोका केवळ शेतांपुरता मर्यादित नसून जागतिक बाजारपेठेपर्यंत पसरला आहे. ‘एल निनो’मुळे भारताच्या बहुतांश भागांत मान्सूनवर परिणाम होईल. ज्यामुळे पिकांच्या वाढीच्या महत्त्वपूर्ण हंगामात भात आणि मक्यासारख्या पावसावर आधारित पिकांचे उत्पादन घटू शकते, असे संघटनेने म्हटले आहे.
संस्थेने पुढे म्हटले आहे की, दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये पाकिस्तान आणि भारतापासून म्यानमार, थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाम आणि पुढे पूर्वेकडे फिलिपिन्स, इंडोनेशिया आणि तिमोर-लेस्तेपर्यंत शेतीला दुष्काळाचा धोका आहे.
ऐतिहासिक आकडेवारी आणि चिंता
जागतिक हवामान संघटनेने नेहमीपेक्षा अधिक तीव्र मान्सून चक्राचा अंदाज वर्तवला असतानाच हा इशारा आला आहे. एफएओचे हे विश्लेषण ४१ वर्षांच्या ऐतिहासिक उपग्रहांच्या छायाचित्रांवर आधारित आहे, ज्याद्वारे तीव्र एल निनोच्या घटनांमुळे कोठे सर्वाधिक गंभीर कृषी दुष्काळ पडला होता, याचा शोध घेण्यात आला आहे.
भारतावरील याचा परिणाम विशेष चिंतेचा विषय आहे. २०१५-१६ च्या एल निनो दरम्यान, भारताचे मक्याचे उत्पादन चार टक्क्यांनी आणि भाताचे उत्पादन एक टक्क्याने घटले होते.
वाढता धोका आणि वाढती आव्हाने
"जेव्हा पाऊस कमी पडतो, तेव्हा त्याचा पहिला फटका शेतीला बसतो. शेतकऱ्याचे आधी पीक नष्ट होऊ शकते, त्यानंतर पशुधन आणि त्यासोबतच त्यांची संपूर्ण उपजीविका धोक्यात येऊ शकते. हा पूर्वीसारखा एल निनो नाही. आज पृथ्वीचे तापमान खूप जास्त आहे आणि संघर्ष तसेच अन्न असुरक्षितता मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. त्यामुळे याचा सर्वात मोठा फटका आधीच असुरक्षित असलेल्या ठिकाणांना बसेल,’ असे एफएओचे नैसर्गिक संसाधन अधिकारी जॉर्ज अल्व्हार-बेल्ट्रान यांनी सांगितले.