देशात टप्याटप्याने SIR; निवडणूक आयोगाची घोषणा; पुढील वर्षी निवडणुका असलेल्या राज्यांपासून प्रारंभ

बिहारमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्विलोकन (एसआयआर) पूर्ण केल्यानंतर आता देशात टप्प्याटप्प्याने ‘एसआयआर’ लागू करण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी केली. याची सुरुवात पुढील वर्षी निवडणूक असलेल्या राज्यांत केली जाणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : बिहारमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्विलोकन (एसआयआर) पूर्ण केल्यानंतर आता देशात टप्प्याटप्प्याने ‘एसआयआर’ लागू करण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी केली. याची सुरुवात पुढील वर्षी निवडणूक असलेल्या राज्यांत केली जाणार आहे.

ज्या राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत किंवा लवकरच होणार आहेत, त्या राज्यांमध्ये ही मतदार याद्या शुद्धीकरण मोहीम राबविली जाणार नाही, कारण स्थानिक पातळीवरील निवडणूक यंत्रणा या प्रक्रियेत गुंतलेली असल्याने ‘एसआयआर’वर लक्ष केंद्रित करणे त्यांच्यासाठी कठीण जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पाच राज्यांव्यतिरिक्त, पहिल्या टप्प्यात काही इतर राज्यांमध्येही ‘एसआयआर’ची प्रक्रिया पार पडू शकते.

बिहारमध्ये मतदार यादीचे शुद्धीकरण पूर्ण झाले असून, जवळपास ७.४२ कोटी मतदारांची अंतिम यादी ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नुकतेच सांगितले की, सर्व राज्यांमध्ये मतदार याद्यांचे ‘एसआयआर’ सुरू करण्याचे काम सुरू आहे आणि त्याच्या अंमलबजावणीबाबतचा अंतिम निर्णय आयोग घेणार आहे. बिहार विधानसभा निवडणुका जाहीर करताना पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कुमार म्हणाले होते की, आयोगाने २४ जून रोजी बिहारमधील ‘एसआयआर’ सुरू करताना देशभरात ही प्रक्रिया राबविण्याची आपली योजना जाहीर केली होती.

ते म्हणाले, ‘याबाबत काम सुरू आहे आणि तीन आयुक्त लवकरच बैठक घेऊन विविध राज्यांतील ‘एसआयआर’ सुरू करण्याच्या तारखांवर निर्णय घेतील.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पुढील १० ते १५ दिवसांत ‘एसआयआर’ सुरू करण्यास सज्ज राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अधिक स्पष्टतेसाठी ३० सप्टेंबरची अंतिम मुदत ठरविण्यात आली होती.

मतदार याद्या तयार ठेवण्याचे आदेश

राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांच्या राज्यातील मागील ‘एसआयआर’नंतरच्या प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्या तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. अनेक राज्यांनी त्या याद्या त्यांच्या वेबसाइटवर आधीच प्रसिद्ध केल्या आहेत.

राज्यांतील शेवटचा ‘एसआयआर’ हे ‘कट-ऑफ’ वर्ष म्हणून वापरण्यात येईल, जसे बिहारमध्ये २००३ ची मतदार यादी सखोल पुनरावलोकनासाठी वापरली गेली होती. बहुतेक राज्यांमध्ये शेवटचा ‘एसआयआर’ हा २००२ ते २००४ दरम्यान झाला होता. बहुतेक राज्यांनी सध्याच्या मतदारांचा मागील ‘एसआयआर’नुसार नकाशा तयार करण्याचे काम जवळजवळ पूर्ण केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in