

नवी दिल्ली : आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून निवडणूक आयोगाने गुरुवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार, उत्तर प्रदेश, पंजाब यांसह १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसएसआर) मोहीम राबवली जाणार आहे.
या मोहिमेसाठी १ जानेवारी २०२७ ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे.
लोकप्रतिनिधी कायदा, १९५० नुसार, निवडणूक आयोगाला विधानसभांचा कार्यकाळ संपण्याच्या सहा महिने आधी निवडणुका घेण्याचे अधिकार आहेत.
नवीन पात्र मतदारांची, विशेषतः तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची नोंदणी करणे, मतदारयादीतील नोंदींमधील चुका दुरुस्त करणे, मतदारयाद्या अधिक शुद्ध आणि अचूक बनवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
कोणती राज्ये
या विशेष पुनरीक्षण मोहिमेमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे, जेथे पुढील वर्षी (२०२७ मध्ये) विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेश: ४०३ सदस्यीय विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी २२ मे रोजी संपत आहे. मणिपूर (६० जागा), गोवा (४० जागा), पंजाब (११७ जागा) आणि उत्तराखंड (७० जागा) या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्च २०२७ मध्ये वेगवेगळ्या तारखांना संपणार आहे.