नवी दिल्ली : हरयाणा निवडणुकीबाबत केलेल्या तक्रारीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तराबद्दल काँग्रेसने नापसंती व्यक्त केली आहे. हरयाणा निवडणुकीबाबत आपल्या तक्रारींवर स्पष्टीकरण दोण्याऐवजी निवडणूक आयोग हा अहंकारात मग्न आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाला काँग्रेसने तीन पानांचे पत्र लिहिले आहे. निवडणूक आयोग तटस्थ नसल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने स्वतःलाच 'क्लीनचिट' दिली आहे. आम्ही केलेल्या तक्रारीबाबत निवडणूक आयोगाची उत्तरे ही अहंकाराने भरलेली होती. हरयाणा निवडणुकीबाबत आमच्या तक्रारी स्पष्ट होत्या. आमच्या तक्रारींना निवडणूक आयोगाने केराची टोपली दाखवली आहे, असा आरोप काँग्रेसने केला.
काँग्रेसने पाठवलेल्या पत्रात पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, खजिनदार अजय माकन, ज्येष्ठ नेते अभिषेक सिंघवी यांची सही आहे.
निवडणूक आयोगाने हरयाणा विधानसभा निवडणुकीतील गैरव्यवहारांचे काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले. तसेच काँग्रेसने निवडणुकीच्या निकालांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याबाबत यापूर्वीही पक्षाने हेच केले होते, असे निवडणूक आयोगाने आपल्या उत्तरात म्हटले होते.
आयोगाकडून स्वतःलाच क्लीनचिट
आयोगाला पाठवलेल्या उत्तरात काँग्रेसने सांगितले की, आपण पाठवलेल्या उत्तरांचा आम्ही अभ्यास केला. निवडणूक आयोगाने स्वतःच स्वतःला क्लीनचिट दिली, यात कोणतेही आश्चर्य नाही. पण, आयोगाची प्रतिक्रियेची भाषा, भाव व काँग्रेसच्या विरोधात लावलेल्या आरोपांमुळे आम्ही प्रतिक्रिया देत आहोत. तुम्हाला कोण सल्ले देते हे आम्हाला माहिती नाही. पण, तुमची स्थापना ही संवैधानिक पद्धतीने झालेली आहे. तुमच्यावर महत्त्वपूर्ण कामाचे उत्तरदायित्व आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.