जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये शक्यतितक्या लवकर निवडणुका घेण्यास निवडणूक आयोग बांधील आहे. निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याचा अंतर्गत अथवा बाह्य शक्तींचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका व्हाव्या, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे तेथे लवकर निवडणुका घेण्यास आम्ही बांधील आहोत, असे राजीवकुमार यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले.
काश्मीर दौऱ्यात यंत्रणांच्या तयारीचा घेतला आढावा
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोगाच्या शिष्टमंडळाने तीन दिवसांचा जम्मू-काश्मीर राज्याचा दौरा केला आणि निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाची आणि सुरक्षा यंत्रणांची सज्जता कितपत आहे, याचा आढावा घेतला. आयोगाने जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव अटल दुल्लो आणि पोलीस प्रमुख आर. आर. स्वाइन यांच्याशी चर्चा केली. जम्मू-काश्मीरमध्ये २०१४ पासून निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत.