
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी करून निवडणूक आयोगाकडून खुलासा मागवला होता. आता विरोधी पक्षनेते आम्हाला थेट पत्र लिहितील, तेव्हा आम्ही त्यांना उत्तर देऊ, असे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.
सूत्र म्हणाले की, आपल्या संपर्क मोहिमेंतर्गत निवडणूक आयोगाने ६ राष्ट्रीय पक्षांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते. ५ पक्षांनी निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. पण, काँग्रेसने १५ मेची बैठक रद्द केली.
गांधी यांच्या आरोपांचे खंडन यापूर्वीच निवडणूक आयोगाने केले आहे. गांधी यांनी महाराष्ट्रातील मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगाकडे मागितले होते. त्यावर निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, निवडणुकीबाबत याचिका दाखल झाल्यानंतर मतदान केंद्रावरील सीसीटीव्हीचा तपास सक्षम उच्च न्यायालय करू शकते.
आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, निवडणूक नियमांसोबतच मतदारांच्या गुप्ततेचे संरक्षण करण्यासाठी निवडणूक आयोग असे करते. राहुल गांधी हे मतदारांच्या गुप्ततेचे उल्लंघन का करू इच्छितात. या निवडणूक गुप्ततेचे संरक्षण निवडणूक कायद्यानुसार करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाला पार पाडायची असते. कोणत्याही गोंधळापासून दूर राहण्यासाठी राहुल गांधी यांना उच्च न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे, असे सूत्र म्हणाले.
भारत निवडणूक आयोगाने काँग्रेसला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका आणि आरोप मांडल्याने आयोगाने याबाबत खेद व्यक्त केला आहे.
गांधी यांनी थेट आयोगाशी संवाद साधण्याऐवजी वारंवार माध्यमांतून आरोप करणे हे आश्चर्यकारक आणि खेदजनक असल्याचे आयोगाचे मत आहे. त्यांनी माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाशी पत्राद्वारे संपर्क साधावा, अशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे.
निवडणूक आयोगाकडे विचारलेल्या अधिकृत प्रश्नांना उत्तर देण्याची आमची प्रक्रिया पारदर्शक आणि ठोस आहे," असेही आयोगाने स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने संभ्रम दूर करावा!
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच संशय बळावला असल्याने या गंभीर प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देऊन संभ्रम दूर करणे अपेक्षित असताना भाजपकडून त्याची उत्तरे दिली जात आहेत हे आणखी गंभीर असून निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाले यावर शिक्कामोर्तब करणारे आहे, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.