

नवी दिल्ली : निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष पुनरावलोकन (एसआयआर) सुरू करणार आहे. आयोगाकडून प्रारंभी राज्यांमध्ये 'एसआयआर' मोहीम सुरू करण्यात येईल. तसेच पुढील वर्षाच्या आत विधानसभा १०-१५ निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये 'एसआयआर' प्रथम सुरू केला जाणार आहे.
'एसआयआर' च्या अंमलबजावणीसाठीची चौकट अंतिम करण्यासाठी आयोगाने अलीकडेच राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) दोन बैठका घेतल्या. अनेक सीईओंनी शेवटच्या 'एसआयआर' नंतर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मतदार याद्या त्यांच्या संबंधित राज्य वेबसाइटवर अपलोड केल्या आहेत.
राज्यांमधील शेवटचा 'एसआयआर' हा 'कट-ऑफ डेट' म्हणून काम करेल, ज्याप्रमाणे २००३ च्या बिहारच्या मतदार यादीचा वापर निवडणूक आयोगाने 'एसआयआर' साठी केला होता. बहुतेक राज्यांनी शेवटचे 'एसआयआर' २००२ ते २००४ दरम्यान केले होते.
बहुतेक राज्यांनी त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलेल्या शेवटच्या 'एसआयआर'च्या आधारे विद्यमान मतदारांशी जुळणी करण्याचे काम जवळजवळ पूर्ण केले आहे. परदेशी बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या जन्मस्थानाची पडताळणी करून बाहेर काढणे हा या 'एसआयआर'चा प्राथमिक उद्देश आहे.
निवडणूक होणाऱ्या या पाच राज्यांत होणार 'एसआयआर'
आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पाच राज्यांमध्ये प्रथम मतदार याद्यांचे विशेष पुनरावलोकन प्रथम करण्यात येणार आहे. पुढील आठवड्याच्या मध्यात निवडणूक आयोग 'एसआयआर'चा पहिला टप्पा जाहीर करण्याची शक्यता आहे. या टप्प्यात १०-१५ राज्यांचा समावेश असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या राज्यांमध्ये नंतर 'एसआयआर'
ज्या राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, तिथे आता 'एसआयआर' मोहीम सुरू केली जाणार नाही. याचे कारण म्हणजे निम्न स्तरावरील कर्मचारी त्या निवडणुकांमध्ये व्यस्त असतील आणि ते 'एसआयआर'साठी वेळ काढू शकणार नाहीत. त्यामुळे या निवडणुका पार पडल्यानंतरच या राज्यांमध्ये 'एसआयआर' मोहीम सुरू केली जाईल.