गोयल यांच्या राजीनाम्यावर खुलासा करा - विरोधकांचा हल्लाबोल; नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती १५ मार्चपर्यंत?

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
गोयल यांच्या राजीनाम्यावर खुलासा करा - विरोधकांचा हल्लाबोल; नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती १५ मार्चपर्यंत?
(अरुण गोयल यांचे संग्रहित छायाचित्र, PTI)

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगात रिक्त असलेल्या दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती १५ मार्च रोजी केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्यापूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी अचानक पदाचा राजीनामा दिला. सध्या राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.

केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल, गृह सचिव, कार्मिक व प्रशिक्षण सचिव हे दोन पदांसाठी पाच नावे काढण्यासाठी दोन समित्या बनवणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांची समिती दोन निवडणूक आयुक्तांची घोषणा करेल. सूत्रांनी सांगितले की, निवड समितीची बैठक १३ किंवा १४ मार्च रोजी होणार आहे. तर निवडणूक आयुक्तांची नेमणूक १५ मार्चपर्यंत होणार आहे.

गोयल यांच्या राजीनाम्यावर खुलासा करा - विरोधक

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी सरकार किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांशी मतभेद झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले का? याचा खुलासा करण्याची मागणी काँग्रेस व विरोधी पक्षांनी केली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्याने तीन प्रश्न निर्माण केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिला का? की वैयक्तिक कारणांनी त्यांनी राजीनामा दिला किंवा कोलकात्ता उच्च न्यायालयाचे न्या. गंगोपाध्याय यांच्याप्रमाणे भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला, असे सवाल त्यांनी केले.

व्हीव्हीपीएटी मशीनबाबत इंडिया आघाडीला आठ महिन्यांपासून निवडणूक आयोग भेटायला तयार नाही. प्रत्येक दिवशी मोदी हे भारतातील लोकशाही व लोकशाही संस्थांचे खच्चीकरण करत आहेत. निवडणुकीत भाजपचे तिकीट मिळण्यासाठी अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याची शक्यता आहे, असा आरोपही जयराम रमेश यांनी केला.

गोयल काय करतात ते पाहावे लागेल - खर्गे

गोयल यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, येत्या काही दिवसांत ते काय करतात हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. मी विचार करत होतो की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी राजीनामा दिल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये सामील झाले आणि तृणमूलला शिव्या देणे सुरू केले. यावरून असे दिसून येते की, भाजपने अशाच मानसिकतेच्या लोकांना नियुक्त केले आहे. आता निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला आहे, ते काय करतात ते पाहण्यासाठी थोडा वेळ थांबू, असे ते म्हणाले.

निवडणूक आयोग भाजपची विस्तारित शाखा - राऊत

शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग आता भाजपची विस्तारीत शाखा झाला आहे. टी. एन. शेषन यांच्या काळातील हा निवडणूक आयोग राहिलेला नाही. गेल्या १० वर्षात निवडणूक आयोग खासगी झाला असून तो भाजपचा भाग झाला आहे. निवडणूक आयोगातील दोन जण गेले असून फक्त एकच जण निवडणूक आयोगात राहिला आहे. भाजपशी संबंधित लोकांना हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट व राज्यपालपदी नेमले आहेत. त्याच पद्धतीने दोन जण भाजपचे निवडणूक आयोगात नेमले जातील, असा आरोप राऊत यांनी केला.

राजीनाम्याचे कारण जाहीर करा -ओवैसी

एमआयएमचे असादुद्दीन ओवैसी यांनी सांगितले की, गोयल यांच्या राजीनाम्याचा खुलासा गोयल व सरकारने केला पाहिजे. गोयल यांनी स्वत: किंवा सरकारने त्यांच्या राजीनाम्याचे कारण जाहीर करायला हवे.

भाजपचे घाणेरडी खेळी आहे का - गोखले

तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले म्हणाले की, प. बंगालचा दौरा अर्धवट टाकून परतल्यानंतर गोयल यांनी राजीनामा का दिला. निवडणुकीपूर्वी असे काय गूढ घडले याचा खुलासा गरजेचा आहे. प. बंगालमधील मते फिरवायला मोदी आणि भाजपच्या घाणेरड्या खेळीचा हा भाग आहे का? असा आरोप त्यांनी केला.

निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल हे राजीनामा देतात यावरून जगातील लोकशाहीला कोणता संदेश दिला जात आहे, असा आरोप तृणमूलच्या खासदार सागरिका घोष यांनी केला.

वैयक्तिक कारणाने गोयल यांचा राजीनामा

अरुण गोयल यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर सूत्र म्हणाले की, गोयल यांनी वैयक्तिक कारणांनी राजीनामा दिला असण्याची शक्यता आहे. गोयल व मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांच्यात मतभेद झाल्याचेही सूत्राने फेटाळले. लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रीय सशस्त्र दलांच्या वाहतुकीसंदर्भात निवडणूक आयुक्त, गृह खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी होणार होती. मात्र, गोयल हे या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in