काँग्रेस अध्यक्षपदी खर्गे यांची निवड; शशी थरूर यांचा पराभव

सोनिया गांधी, राहुल गांधी, शशी थरूर यांच्यासह महाराष्‍ट्रातील काँग्रेसच्या नेत्‍यांनी खर्गे यांचे अभिनंदन केले आहे
काँग्रेस अध्यक्षपदी खर्गे यांची निवड; शशी थरूर यांचा पराभव

शशी थरूर यांच्यावर दणदणीत विजय मिळवत ८० वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. खर्गे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली, तर प्रतिस्‍पर्धी उमेदवार शशी थरूर यांना १०७२ मते मिळाली. १३७ वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेसला तब्‍बल २४ वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेस पक्षाला नवी उभारी देण्याचे मोठे आव्हान मल्‍लिकार्जुन खर्गे यांच्यासमोर असणार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, शशी थरूर यांच्यासह महाराष्‍ट्रातील काँग्रेसच्या नेत्‍यांनी खर्गे यांचे अभिनंदन केले आहे.

मल्‍लिकार्जुन खर्गे हे गांधी घराण्याचे अतिशय विश्वासू मानले जातात. त्‍यांनी १९६९ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नऊ वेळा आमदार, खासदार अशी अनेक पदे त्‍यांनी भूषविली. २०१४ साली ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले. २०२० साली ते राज्‍यसभेवर गेले. गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्‍यानंतर ते राज्‍यसभेतील विरोधी पक्षनेते झाले. काँग्रेस सध्या अतिशय वाईट कालखंडातून जात आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते देशात पदभ्रमंती करत आहेत. आतापर्यंत या यात्रेने १ हजार किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. आता २०२४ साली पक्षाला नवी उभारी देण्याचे मोठे आव्हान खर्गे यांच्यासमोर असणार आहे.काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला मतदान झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसच्या ९ हजार ३८५ प्रतिनिधींनी मतदान केले होते. अधिकृत माहितीनुसार, खर्गे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली, तर शशी थरूर यांना केवळ १ हजार ७२ मते मिळाली. ४१६ मते नाकारण्यात आली. खर्गे यांनी शशी थरूर यांचा जवळपास ७ हजार मतांनी पराभव केला. मतमोजणी सुरू असतानाच राहुल गांधी यांनी पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार, हे सांगितले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान आंध्रमधील पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले होते, ‘‘आता माझी भूमिकाही खर्गेजीच ठरवतील.’’

सध्या सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. २००१ साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या होत्या. त्यानंतर २१ वर्षांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. यापूर्वी सीताराम केसरी हे काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचे अध्यक्ष लाभले होते. आता २४ वर्षांनंतर पहिल्यांदाच बिगर-गांधी कुटुंबातील सदस्य काँग्रेसचा अध्यक्ष बनला आहे.

थरूर यांची तक्रार

मतमोजणीदरम्यान थरूर यांचे मुख्य निवडणूक प्रचारक सलमान सोज यांनी हेराफेरीचा आरोप केला. उत्तर प्रदेश, पंजाब आणि तेलंगणामध्ये मतदानापूर्वी, दरम्यान आणि नंतर अनियमितता केल्याचा आरोप केला. सोज म्हणाले, ‘‘आम्ही पक्षाचे निवडणूक प्रभारी मधुसूदन मिस्त्री यांना याबाबत कळवले आहे.’’ यावर राहुल गांधी म्हणाले, ‘‘काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, ज्यात निवडणुका होतात आणि त्याचा स्वतःचा निवडणूक आयोग आहे. काँग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्यासोबत मी काम केले आहे. सर्व बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या असून ते कारवाई करणार आहेत. प्रत्येकजण काँग्रेसच्या निवडणुकीबद्दल विचारतो. मला काँग्रेसचा अभिमान आहे, ज्यात खुल्या आणि पारदर्शक निवडणुका होत आहेत.’’

निवडून आलेले सहावे अध्यक्ष

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३७ वर्षांच्या इतिहासात निवडणुकीने निवडून आलेले मल्लिकार्जुन खर्गे हे सहावे अध्यक्ष आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष होणे हा सर्वात मोठा सन्मान आणि मोठी जबाबदारी आहे. खर्गेजी या कार्यात सर्वस्वी यशस्वी व्हावेत, अशी माझी इच्छा आहे. मला मिळालेला पाठिंबा आणि हितचिंतकांच्या आशा, आकांक्षा देशभर घेऊन जाणे, हा माझा बहुमान होता.

- शशी थरूर

काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खर्गे यांचे अभिनंदन. विरोधी पक्षांचे ऐक्य राखण्यासाठी खर्गे यांच्यासोबत काम करण्यास मलाही आनंद आहे. यांची कारकिर्द नक्कीच प्रेरणादायी होईल. - शरद पवार

यापुढे मलाही खर्गे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. काँग्रेसचा अध्यक्ष हा लोकशाही मूल्यांची जपणूक करणारा असतो. ही परंपरा कायम ठेवत ते पक्षवाढीसाठी काम करतील, असा मला विश्वास आहे. त्यांचा दांडगा अनुभव आणि पक्षनिष्ठा पक्षाला नव्या दिशेने घेऊन जाईल.

- राहुल गांधी

‘काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय हा लोकशाही पद्धतीने झाला असून, देशात काँग्रेस हाच एक पक्ष आहे ज्या पक्षात कार्यकर्त्यांमधून अध्यक्ष निवडला जातो. मल्लिकार्जुन खर्गे यांचा दांडगा अनुभव व सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत होईल आणि केंद्रातील हुकूमशाही सरकारचा पराभव करेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.’’- नाना पटोले

‘‘मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल आणि धर्मांध हुकूमशाही शक्तींना पराभूत करेल.’’ -बाळासाहेब थोरात

‘‘मल्लिकार्जुन खर्गे यांना ५० वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. या कारकीर्दीत खर्गे यांनी पक्षसंघटना व सरकारमधील विविध पदांवर काम पाहिले आहे. पक्षाने त्यांना दिलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी घेईल.’’ - अशोक चव्हाण

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in