बंगळुरू : निवडणूक रोखे योजनेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतरांच्या सुरू असलेल्या चौकशीला सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. दरम्यान, वादानंतर सदर निवडणूक रोखे योजना रद्द करण्यात आली आहे.
याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये भाजपचे नेते नलीनकुमार कतील यांचेही आरोपी म्हणून नाव आहे, ज्यात निवडणूक रोख्यांच्या नावाखाली खंडणीचा आरोप आहे. त्याला आव्हान देणारी याचिका कतील यांनी केली होती. त्यावर न्या. एम. नागप्रसन्ना यांनी अंतरिम आदेश दिला. याप्रकरणी पुढील सुनावणी २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
निवडणूक रोखे योजनेबाबत तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी सीतारामन आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचेही ‘एफआयआर’मध्ये नाव आहे.