ऑगस्ट महिन्यात वीज खपात; १६ टक्के वाढ

आगामी काळात वीज खप आणि मागणी स्थिरावेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे
ऑगस्ट महिन्यात वीज खपात; १६ टक्के वाढ

नवी दिल्ली : पावसाने जवळजवळ संपूर्ण ऑगस्ट महिन्यात देशात सर्वत्रच दडी मारल्यामुळे उष्मा वाढला आणि एसी, पंख्यांचा वापर वाढला. परिणामी या महिन्यात देशातील वीज खपात तब्बल १६ टक्के म्हणजे १५१.६६ अब्ज युनिटची वाढ झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात देशात एकूण १३०.३९ अब्ज युनिट वीज खप झाला होता जो त्याआधीच्या २०२१ सालातील १२७.८८ युनिटपेक्षा कमी होता. याउलट ऑगस्ट २०२३ महिन्यात विजेची मागणी २३६.५९ गिगावॅटपर्यंत वाढली. २०२२ साली ही मागणी १९५.२२ गिगावॅट होती, तर ऑगस्ट २०२१ मध्ये ही मागणी २९६.२७ गिगावॅट होती. यंदा उन्हाळी हंगामात वीज मागणी २२९ गिगावॅटपर्यंत वाढेल, असा अंदाज वीज मंत्रालयाने आधीच व्यक्त केला होता. मात्र अवकाळी पावसामुळे वीज मागणीची ही पातळी एप्रिल-जुलै महिन्यात पोहोचू शकली नाही. मात्र जून महिन्यात वीज मागणीची पातळी २२३.२९ गिगावॅटपर्यंत पोहोचली, तर जुलै महिन्यात २०८.९५ गिगावॅटवर मागणी स्थिरावली होती. वीज उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार यंदा मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यात देशभरात पाऊस पडल्यामुळे वीज मागणीवर परिणाम झाला होता. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे पडलेले कडक ऊन आणि त्यामुळे हवेत वाढलेली आर्द्रता यामुळे घरगुती वीज वापर वाढला. तसेच आगामी सणासुदीच्या हंगामामुळे औद्योगिक वीज वापरात देखील ऑगस्ट महिन्यात वाढ झाली. यामुळेच ऑगस्ट महिन्यात विजेची मागणी २३६.६९ गिगावॅट या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचली. तसेच १ सप्टेंबर २०२३ रोजी तर या मागणीने २३९.९७ हा नवा उच्चांक स्थापन केला. मात्र आगामी काळात वीज खप आणि मागणी स्थिरावेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in