‘गो फर्स्ट’ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग ; प्रवासी थोडक्यात बचावले

खराब हवामानामुळे हे विमान जयपूरला उतरवण्यात आले, असे ‘डीजीसीए’कडून सांगण्यात आले
 ‘गो फर्स्ट’ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग ; प्रवासी थोडक्यात बचावले

दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या ‘गो फर्स्ट’ विमानाच्या खिडकीची काच तुटल्याने हे विमान जयपूरला उतरवण्यात आले, त्यामुळे या विमानातील प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. गो फर्स्टचे (पूर्वीचे गो एअर) जी८-१५१ या विमानाने बुधवारी दुपारी १२.४० वाजता उड्डाण घेतल्यानंतर हवेतच खिडकीची काच तुटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे विमान पुन्हा दिल्लीला नेण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र खराब हवामानामुळे हे विमान जयपूरला उतरवण्यात आले, असे ‘डीजीसीए’कडून सांगण्यात आले.

विशेष म्हणजे, गो फर्स्टच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याची दोन दिवसातील ही तिसरी घटना ठरली आहे. यापूर्वी मंगळवारी रनवेवर कुत्रा आल्याने गो फर्स्टचे विमान उड्डाण घेऊ शकले नव्हते,तसेच इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गो फर्स्टच्या विमानांना दुसरीकडेच उतरवण्यात आले होते. “प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून विमानाची देखभाल करूनच उड्डाण घेण्यात आले होते; मात्र खिडकीची काच तुटल्याने हे विमान जयपूरला उतरवण्यात आले. या विमानातील प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली, तसेच त्यांना जयपूरहून गुवाहाटीला पर्यायी विमानाने पाठवण्यात आले,” असे स्पष्टीकरण गो फर्स्टकडून देण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना वारंवार घडू लागल्यामुळे नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (डीजीसीए) नाराजी व्यक्त केली आहे. “प्रमाणित कर्मचाऱ्यांकडून विमानाच्या सुरक्षेसंबंधी मंजुरी दिल्याशिवाय कोणत्याही एअरलाइन्सच्या विमानांना उड्डाण घेता येणार नाही,” असे निर्देश डीजीसीएने दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in