ठाकरेंसाठी मोदींची साखरपेरणी; बाळासाहेबांवर स्तुतिसुमने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी भावुक होऊन व्यक्त केलेल्या मतांमुळे आगामी काळात दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाकरेंसाठी मोदींची साखरपेरणी; बाळासाहेबांवर स्तुतिसुमने

एस. बालकृष्णन/मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी भावुक होऊन व्यक्त केलेल्या मतांमुळे आगामी काळात दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोदी यांचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी केलेली साखरपेरणीच असावी, अशी चर्चा आहे.

मुलाखतीत मोदींनी दावा केला की, त्यांचे ठाकरे कुटुंबाशी घनिष्ट संबंध आहेत. भाजपचे बहुमत असतानाही त्यांनी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होऊ दिले हे बाळासाहेबांचे त्यांच्यावर प्रेम असल्यामुळेच.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार पडल्यानंतर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवले जाईल असे वाटत असतानाच अचानक शिंदे मुख्यमंत्री बनले होते. ही बाळासाहेबांना श्रद्धांजली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. उद्धव ठाकरे यांना राजकारणाच्या क्षेत्राव्यतिरिक्त अन्य कोठेही समस्या आली तर त्यांच्यासाठी प्रथम मदतीला धावणारा मी असेन, असेही मोदी म्हणाले. मोदी यांनी नुकतेच शिवसेना ठाकरे गटाला ‘नकली सेना’ म्हणून हिणवले होते.

आगामी काळात जवळीकीचे सुतोवाच

उद्धव ठाकरे हेदेखील निवडणूक प्रचारादरम्यान मोदी यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींचे हे ताजे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. कदाचित लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापण्याइतके बहुमत भाजपला मिळाले नाही तर कमी पडणाऱ्या जागांची जुळवाजुळव करण्याचा हेतू मोदी यांच्या वक्तव्यामागे असू शकतो. त्या दृष्टीने ही साखरपेरणी चालू असावी, असा अंदाज राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in