राज्यात नवीन फौजदारी कायदे लागू करा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निर्देश

केंद्र सरकारने तयार केलेले नवे फौजदारी कायदे महाराष्ट्रातील सर्व पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत लवकरात लवकर अंमलात आणावेत, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले.
अमित शहा
अमित शहा संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने तयार केलेले नवे फौजदारी कायदे महाराष्ट्रातील सर्व पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत लवकरात लवकर अंमलात आणावेत, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले.

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीन नव्या फौजदारी कायद्यांवर चर्चा झाली. तसेच या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, पोलीस, तुरुंग, न्यायालय, वकील व न्यायवैद्यक आदींची सध्याची परिस्थिती आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला. या नवीन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी दोन आठवड्यातून एक वेळा आढावा बैठक घ्यावी, तर मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांनी आठवड्यातून एकदा आढावा घ्यावा, असे शहा यांनी सांगितले.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, जे तीन नवे फौजदारी कायदे झाले आहेत त्या तिन्ही कायद्यांसंदर्भात एक आढावा बैठक शहा यांनी घेतली. या कायद्याची राज्यात अंमलबजावणी कशी झाली आहे? पायाभूत सुविधांची तयारी कितपत झाली? किती गुन्हे नोंदविण्यात आले, याची माहिती शहा यांनी घेतली.

राज्यातील आतापर्यंत किती पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले त्याची माहिती अमित शहा यांना आम्ही दिली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

खटला कमी वेळेत निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील

दरम्यान, ऑनलाइन कोर्ट क्युबिकल कसे जोडता येईल, कोर्टातील गर्दी कमी करण्यासाठी काय करता येईल, याची माहिती दिली. कमीत कमी वेळेत खटला कसा निकाली निघेल यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहोत. तिन्ही कायदे लागू करण्याची प्रक्रिया राज्यात व्यवस्थित सुरू आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in