नवी दिल्ली : कोलकाता येथे डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी प्रथमच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘बस, आता अति झाले, कोलकाता येथील घटना हताश करणारी आणि धक्कादायक आहे, कोलकातामध्ये जेव्हा विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करीत होते, तेव्हा या प्रकरणातील आरोपी उजळ माथ्याने फिरत होते, असे द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे.
देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, कोलकातानंतर देशातील अन्य काही राज्यांमध्येही अशाच प्रकारच्या घटना घडल्याचे उजेडात आले आहे, नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत, त्यावर राष्ट्रपतींनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला त्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
देशाने आता महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या विकृतीविरोधात जागे होण्याची वेळ आली आहे. महिला दुबळ्या, क्षमता आणि बुद्धिमत्ता नसलेल्या आहेत, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे,असेही मुर्मू यांनी म्हटले आहे.
कोणताही सुसंस्कृत समाज मुलींवर अशाप्रकारे अत्याचार होऊ देऊ शकत नाही. समाजाला आता प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नागरिकांनी स्वत:ला कठीण प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रियाही मुर्मू यांनी व्यक्त केली आहे.
'वुमन्स सेफ्टी : इनफ इज इनफ' असे मुर्मू यांच्या लेखाचे शीर्षक असून त्यांनी प्रथमच कोलकाता घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. वृत्तसंस्थेच्या ज्येष्ठ संपादकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी हा लेख लिहिला आहे. कोलकातामध्ये विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करीत असताना आरोपी उजळ माथ्याने हिंडत होते, पीडितांमध्ये चिमुकल्या मुलींचाही समावेश आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी आपण शालेय विद्यार्थांशी संवाद साधला, तेव्हा त्या लहानग्यांनी आपल्याला निष्पापपणे प्रश्न विचारला की, निर्भया-पद्धतीचा प्रसंग भविष्यात घडणार नाही याची आपण खात्री देऊ शकाल का, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.