'संपूर्ण पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताचाच'; लडाखच्या LG नी ठणकावले, शक्सगाम खोऱ्यावरील चीनचा दावा फेटाळला

शक्सगाम खोऱ्यावर चीनने केलेला दावा फेटाळून लावत संपूर्ण पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताचाच आहे, कोणतेही विस्तारवादी प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असे लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी ठणकावले.
लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांचे संग्रहित छायाचित्र
लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांचे संग्रहित छायाचित्रPC - X
Published on

जम्मू : शक्सगाम खोऱ्यावर चीनने केलेला दावा फेटाळून लावत संपूर्ण पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताचाच आहे, कोणतेही विस्तारवादी प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असे लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी ठणकावले. भारताच्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर चीनने सोमवारी शक्सगाम खोऱ्यावर आपला दावा केला होता. या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

पाकव्याप्त संपूर्ण काश्मीर आमचाच आहे. पाकने चीनसोबत नेमका काय व्यवहार केला आहे, हे आम्हाला माहीत नाही. चीनने समजून घ्यावे की, विस्तारवादी धोरणातून काहीही साध्य होणार नाही. भारत सक्षम आहे. हा १९६२ चा भारत नाही; हा २०२६ चा भारत आहे. अशा कोणत्याही प्रयत्नांना उधळून लावले जाईल. परराष्ट्र मंत्रालय याची दखल घेत आहे, असे गुप्ता यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पाकिस्तानवर टीका करत उपराज्यपालांनी शेजारी देशाने आपल्या जनतेलाच अपयशी ठरवले असून ते संशयास्पद व्यवहारांमध्ये गुंतले असल्याचा आरोप केला. पाकिस्तान हा विक्रीस ठेवलेला देश आहे. त्याला आपल्या सार्वभौमत्वाची किंवा स्वतःच्या जनतेची चिंता नाही. बलुचिस्तान, सिंध आणि कराचीत जनतेत असंतोष आहे. तेथे पाकिस्तानी लष्कराकडून अत्याचार होत आहेत. त्या भागांवर प्रत्यक्षात लष्करच राज्य करत आहे,’ असे गुप्ता म्हणाले. ‘पाकने चिथावणीखोर स्वरूपाची विधाने करू नयेत. १९९४ चा संसदीय ठराव स्पष्टपणे सांगतो की संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे, असे ते म्हणाले.

लष्करप्रमुखांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असल्याच्या अलीकडेच केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना गुप्ता म्हणाले की, ‘सशस्त्र दलांना संपूर्ण देशाचा पाठिंबा आहे. संपूर्ण देश लष्कराच्या पाठीशी उभा आहे. लष्करप्रमुखांनी जबाबदार विधान केले असून मी त्याचे स्वागत करतो.’

जम्मू-काश्मीरमधील काही प्रादेशिक नेत्यांनी लडाखमधील अस्थिरतेबाबत केलेल्या आरोपांना उपराज्यपालांनी ठामपणे फेटाळले.

logo
marathi.freepressjournal.in