वॉशिंग्टन : उद्योजक आणि वैमानिक असलेले गोपी थोटाकुरा हे ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड (एनएस-२५) मोहिमेवर पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय बनणार आहेत. विंग कमांडर राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून प्रवास केला होता. ते भारताचे पहिले अंतराळवीर बनले होते. त्यानंतर थोटाकुरा हे अंतराळात प्रवास करणारे दुसरे भारतीय ठरणार आहेत. या मोहिमेसाठी सहा कर्मचाऱ्यांपैकी एक म्हणून थोटाकुरा यांची निवड करण्यात आली.
आंध्र प्रदेशात जन्मलेले थोटाकुरा एम्ब्री-रिडल एरोनॉटिकल विद्यापीठाचे पदवीधर आहेत. त्यांच्यासोबत या मोहिमेत मेसन एंजेल, सिल्वेन चिरॉन, केनेथ एल. हेस, कॅरोल शॅलर आणि माजी वायुसेना कॅप्टन एड. ड्वाइट यांचा समावेश आहे. उड्डाणाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, असे एरोस्पेस कंपनीने सांगितले. आतापर्यंत न्यू शेपर्ड या अभियानातील हे सातवे मानवी उड्डाण असेल. आजपर्यंत या कार्यक्रमाद्वारे ३१ जणांनी अंतराळात उड्डाण केले आहे. न्यू शेपर्ड हे पूर्णपणे पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन आहे. ते ब्ल्यू ओरिजिनने अवकाश पर्यटनासाठी विकसित केले आहे. न्यू शेपर्डचे इंजिन द्रव ऑक्सिजन आणि हायड्रोजनद्वारे चालते. पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून न्यू शेपर्डच्या सुमारे ९९ टक्के भागांचा पुनर्वापर केला जातो.