
नवी दिल्ली : आपत्कालिन कामासाठी ‘पीएफ’मधून पैसे काढण्याची मर्यादा एक लाखावरून पाच लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. आता कर्मचाऱ्यांना आपत्कालिन कामासाठी हे पैसे काढता येऊ शकतील, अशी घोषणा केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी केली.
केंद्रीय भविष्य निर्वाह निधीच्या (ईपीएफओ) सदस्यांना ५ लाखांपर्यंतची रक्कम तीन दिवसात मिळणार आहे. सध्या ही मर्यादा एक लाख रुपये आहे. ती मर्यादा वाढवून पाच लाख करण्यात आली असून याचा फायदा लाखो भागधारकांना होणार आहे, असे मांडविया म्हणाले.
‘ईपीएफओ’चे सात कोटी भागधारक आहेत. या भागधारकांसाठी ऑनलाईन पैसे मिळण्याची सोय आहे. सध्या आजारपण, शिक्षण, विवाह व घर खरेदीसाठी भागधारकांना पैसे काढता येतात. भागधारकाने मागणी केल्यानंतर कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलित पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतर केले जातात.
‘ईपीएफओ’ने स्वयंचलितपणावर अधिक भर दिला आहे. यातून भागधारकांना वेगाने व प्रभावी सेवा मिळत आहे.