एपस्टीन फाईल्समध्ये 'मोदी ऑन बोर्ड' उल्लेख असल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

एपस्टीन फाइल्समधील काही माहिती १९ डसेंबरला समोर आली असून त्यामध्ये पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांचा उल्लेख आढळला आहे. त्याशिवाय 'मोदी ऑन बोर्ड' असे एपस्टीनने पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिले आहे, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आणि त्याबाबत सरकारने खुलासा करण्याची मागणीही केली.
एपस्टीन फाईल्समध्ये 'मोदी ऑन बोर्ड' उल्लेख असल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
Published on

कराड : एपस्टीन फाइल्समधील काही माहिती १९ डसेंबरला समोर आली असून त्यामध्ये पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांचा उल्लेख आढळला आहे. त्याशिवाय 'मोदी ऑन बोर्ड' असे एपस्टीनने पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिले आहे, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आणि त्याबाबत सरकारने खुलासा करण्याची मागणीही केली.

एपस्टीन फाईल्सबाबत चव्हाण म्हणाले की, १९ डिसेंबरला अमेरिकने काँग्रेसने एपस्टीन फाईल्समधील अंशतः माहिती सार्वजनिक केली आहे. जवळपास ३० हजार फोटो, ईमेल आणि अन्य डेटा यात असल्याने ही संपूर्ण फाईल सार्वजनिक करण्यासाठी आणखी काही आठवडे लागतील, असे तेथील ॲटर्नी जनरल यांनी सांगितले आहे, असे ते म्हणाले.

मंत्री हरदीपसिंग पुरींचे नाव ?

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, एपस्टीन फाईलमध्ये अनेक फोटो आहेत. त्यात स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो असल्याने ते दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या खासदाराने एपस्टीन फाईल्सबाबत विधेयक मांडले होते, ते मूळ भारतीय वंशाचे आहेत. त्यांनी एका मुलाखतीत, आम्ही जारी केलेले पुरावे पाहत आहोत पण आमचे समाधान होत नाही, असे म्हटले आहे. अमेरिकन सरकारकडून काही माहिती लपवण्याचा प्रयत्न होत आहे. जी माहिती समोर आली आहे त्यातील ईमेलमध्ये काही भारतीयांचा उल्लेख आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे नाव एका ईमेलमध्ये आहे, असे त्यांनी सांगितले.

अनिल अंबानी यांचेही नांव

त्याशिवाय ट्रम्प यांच्या प्रशासनातील एक मोठा अधिकारी ज्याला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचे होते. त्याने एपस्टीनला ईमेल केला होता. त्यानंतर काही दिवसांनी 'मोदी ऑन बोर्ड' असे उत्तर एपस्टीनकडून त्याला मिळाले होते. याचा अर्थ मोदी भेटायला तयार आहेत. आता मोदी आणि एपस्टीन यांचे काय नाते आहे, जो मोदींची भेट कुणालाही देऊ शकतो, याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल. त्यासोबत एक माजी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचेही नाव आहे. अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील मोठे व्यक्ती आहेत त्यांच्याही नावाचा उल्लेख आहे. अजूनही या फाईल्समध्ये काय काय माहिती आहे याचा शोध घेतला जात आहे. ही माहिती सार्वजनिक असल्याने कुणालाही सहज उपलब्ध होईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

स्वतंत्र संकेतस्थळ

दरम्यान, अमेरिकेन संसदेकडून एपस्टीन फाईल्सबाबत स्वतंत्र संकेतस्थळ बनविण्यात आले आहे. त्यात सगळी माहिती वाचता येईल. आतापर्यंत खटल्यात काय काय समोर आले ती प्रचंड सामुग्री डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचे विश्लेषण करायला काही काळ लागेल. मला जी माहिती अमेरिकन माध्यमातून मिळाली त्यातून भारताच्या राजकारणात एपस्टीन फाईलचे परिणाम होतील असे मला वाटत होते. मी कुणाचेही नाव याआधी घेतले नव्हते. भारताच्या राजकारणात आमूलाग्र बदल होईल, असे विधान मी केले होते. त्याची खूप चर्चा झाली. देशभर ते विधान गाजले. बाल लैंगिक शोषणाचे हे प्रकरण फार गंभीर आहे. अमेरिकेत यावर संघर्ष सुरू आहे. एपस्टीन फाईलबाबत माहिती समोर यायला आणखी काही आठवडे लागतील, असेही चव्हाण यांनी सांगितले.

मोदी-एपस्टीन संपर्क कसा ?

एपस्टीन फाईल्समधून काही नावे समोर आली, त्यात त्यांनी गुन्हा केलाय का हे सांगता येणार नाही. परंतु, एपस्टीनसोबत यांचे संबंध कसे आले हा प्रश्न आहे. २००८-०९ या काळात एपस्टीनला लैंगिक शोषणाखाली शिक्षा झाली. तो गुन्हेगार आहे हे सगळ्यांना माहिती होते. मोदींचा संदर्भ २०१४ मधील आहे. एपस्टीन हा विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे. देहव्यापार करतो हे माहिती असताना मोदी आणि एपस्टीन यांची गाठ कुणी घालून दिली, हरदीप पुरी हे अमेरिकेत भारताचे राजदूत होते. त्यांचेही नाव आले आहे. हे सगळे शोधावे लागेल, असे सांगत भारत सरकारकडून यावर खुलासा होत नाही हा चिंतेचा विषय आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in