कोलकाता : विराट कोहलीने रविवारी एकदिवसीय कारकीर्दीतील ४९ वे शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी साधली. वाढदिवशी कोहलीने चाहत्यांच्या प्रेमाला नाबाद शतकाच्या रूपाने रिटर्न गिफ्ट दिले. त्याला गोलंदाजांच्या कामगिरीची उत्तम साथ लाभल्याने भारताने एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी फडशा पाडला. भारताचा हा सलग आठवा विजय ठरला. सचिनच्या शतकांची बरोबरी साधणे स्वप्नवत असून हे यश संपूर्ण देशवासियांना समर्पित करतो, असे विराट आनंदाने म्हणाला.
- विराटने २७७ डावांत ४९ एकदिवसीय शतके झळकावली. तर सचिनने यासाठी ४५२ डाव घेतले.
-विराटची आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण ७९ शतके झाली असून यामध्ये कसोटीतील २९, तसेच टी-२० तील एका शतकाचाही समावेश आहे.
-विराटने आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय प्रकारातील पाचवे शतक साकारले. याबाबतीतही त्याने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली.
-विराटने यंदाच्या विश्वचषकात २ शतके व ४ अर्धशतकांसह भारताकडून सर्वाधिक ५४३ धावा केल्या आहेत.