

नवी दिल्ली : मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडांमधील गुंतवणूकदारांच्या वाढत्या रसामुळे ऑगस्ट महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये २९,३२९ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली. हा गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक निव्वळ गुंतवणुकीचा टप्पा आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (ॲम्फी) द्वारे गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यातील २४,६९७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या तुलनेत हा आकडा तब्बल १९ टक्क्यांनी जास्त आहे.
इक्विटी योजनांमधील वाढता आत्मविश्वास विशेषतः मिडकॅप आणि स्मॉलकॅप श्रेणीतील गुंतवणुकीतून स्पष्टपणे दिसून येतो.
विविध श्रेणींमधील स्थिती
स्मॉलकॅप फंड : ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ७,९७३ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली.
मिडकॅप फंड : या श्रेणीने ६,९८९ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली.
लार्जकॅप फंड : या श्रेणीत मात्र ऑगस्ट महिन्यात १,१४७ कोटी रुपयांचा निव्वळ निर्गुंतवणूक पाहायला मिळाली.
गोल्ड ईटीएफ : सोनेमधील ईटीएफ गुंतवणुकीचा प्रवाह ऑगस्टमध्येही कायम राहिला. २,५९७ कोटींची गुंतवणूक झाली. जुलैमधील १,५५९ कोटींच्या तुलनेत वाढ आहे.
इक्विटी श्रेणीतील गुंतवणुकीचा कल
ऑगस्ट महिन्यात इक्विटी-ओरिएंटेड योजनांमध्ये २९,३२८.६२ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली. एप्रिल महिन्यात ३८,४४० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती, त्यानंतरची ही एका महिन्यातील सर्वाधिक गुंतवणूक ठरली आहे. जूनमध्ये ₹२८,९७३ कोटी, तर मेमध्ये ₹२२,९०८ कोटी गुंतविण्यात आले आहेत.
उद्योगाची स्थिती आणि डेट फंड
संपूर्ण म्युच्युअल फंड उद्योगाचा विचार करता, जुलै महिन्यातील २.३६ लाख कोटी रुपयांच्या अवाढव्य गुंतवणुकीच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात निव्वळ गुंतवणूक घसरून ४१,३५३ कोटी रुपयांवर आली.
या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे कर्ज आधारित योजनांमधून झालेला बाहेर पडलेला निधी होय. जुलै महिन्यात डेट फंडांमध्ये
१.८८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
ऑगस्ट महिन्यातील इक्विटी गुंतवणूक ₹ २९,३२९ कोटी
जुलैच्या तुलनेत वाढ १९%
एकूण मालमत्ता (ऑगस्ट अखेर) ₹८७.०७ लाख कोटी
स्मॉलकॅप फंड (ऑगस्ट) ₹७,९७३ कोटी (सर्वोच्च)
मिडकॅप फंड (ऑगस्ट) ₹६,९८९ कोटी
गोल्ड ईटीएफ ₹२,५९७ कोटी