कामचुकार बँकिंग कर्मचाऱ्यांना धडा मिळणार;आरबीआयच्या नियमांबाबत ग्राहक अनभिज्ञ

बँकेने तसेच तेथील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी नम्रपणे वागणे गरजेचे असते.
कामचुकार बँकिंग कर्मचाऱ्यांना धडा मिळणार;आरबीआयच्या नियमांबाबत ग्राहक अनभिज्ञ

बँकेत गेल्यावर आपले काम झटकन होईल, याची शाश्वती कुणालाही नसते. बराच वेळ रांगेत घालवल्यानंतर आपला नंबर आल्यावर समोरील कर्मचारी कोणत्या ना कोणत्या कारणाने जागेवरून उठतो आणि आपले टाळकेच सटकते. तो कर्मचारी परत जागेवर कधी येईल, याची वाट पाहण्यावाचून कोणताही पर्याय ग्राहकासमोर नसतो. काही वेळेला एका काऊंटरवरून दुसऱ्या काऊंटरवर टोलवाटोलवी सुरू असते. सरकारी बँकांमध्ये अपवाद वगळता हे चित्र नेहमीचेच असते. मात्र, बँक कर्मचाऱ्यांनाही धडा शिकवणारे नियम आरबीआयने ग्राहकांना दिले आहेत. मात्र, या नियमांबाबत ग्राहकांना कोणतीही कल्पना नसते, त्यामुळेच कामचुकार कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावते.

ग्राहकांना बँकिंग सेवांशी संबंधित काही अधिकार असतात; मात्र माहितीच्या अभावी ते या सेवांचा लाभ घेऊ शकत नाहीत. बँकेने तसेच तेथील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी नम्रपणे वागणे गरजेचे असते. बँकेने योग्य वर्तन न केल्यास ग्राहकांना थेट रिझर्व्ह बँकेकडे संपर्क साधण्याचा अधिकार आहे. तसेच असे कोणतेही प्रकरण तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही बँकिंग लोकपालकडे तक्रार करून तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता.

बँकेच्या ग्राहकांना अनेक अधिकार आहेत; मात्र त्याची योग्य माहिती नसल्याने कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा सहन करून ग्राहकांना शांत बसावे लागते. कोणत्याही बँकेच्या कर्मचाऱ्याला तुमचे काम करण्यास उशीर झाला तर तुम्ही त्या बँकेच्या व्यवस्थापक किंवा नोडल ऑफिसरकडे तक्रार करू शकता. याशिवाय जवळपास प्रत्येक बँकेत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण मंच असतो. तेथे तक्रार करूनही तुम्ही तुमची समस्या सोडवू शकता. त्याचबरोबर खाते असलेल्या बँकेच्या क्रमांकावर तक्रार निवारण क्रमांकावरही ग्राहकांना तक्रार करता येते. तसेच टोल फ्री क्रमांकावरही तक्रार नोंदवू शकता. त्याचबरोबर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या ऑनलाइन तक्रार सेवा सुरू केल्या आहेत, त्याद्वारेही तक्रार सोडवण्याचा पर्याय ग्राहकांसमोर असतो.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in