देशात एकता मॉल्सची स्थापना : पंतप्रधान मोदी

हस्तकलेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जपणार
देशात एकता मॉल्सची स्थापना : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : हस्तकलेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जपण्याच्या उद्देशाने देशभरात एकता मॉल्स स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. सोमवारी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीचा (एनआयएफटी) उपक्रम असलेल्या भारतीय वस्त्र आणि शिल्प कोष या ई-पोर्टलचे उद‌्घाटनही मोदी यांनी केले.

गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याजवळ (स्टॅच्यू ऑफ युनिटी) असलेल्या एकता मॉलचे २०२० साली पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद‌्घाटन झाले होते. तेथे दोन मजली इमारतीच्या प्रशस्त दालनांमध्ये देशाच्या विविध प्रदेशांतील कारागिरांनी बनवलेल्या हस्तकला वस्तू विक्रीसाठी मांडल्या आहेत. या मॉलद्वारे विविधतेतून एकता या उक्तीचा प्रत्यय येतो. त्याच धर्तीवर प्रत्येक राज्याच्या राजधानीत एकता मॉल्सची स्थापना केली जाणार असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.

देशात ७ ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशी आंदोलनाला सुरुवात झाली. त्या अनुषंगाने स्वदेशीच्या महत्त्वाबद्दल मोदी यांनी भाष्य केले. स्वदेशी हस्तकला आणि कुटिरोद्योगांची वेगाने वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मोदी यांनी त्यांच्या व्होकल फॉर लोकल या मंत्राचा पुनरुच्चार केला.

logo
marathi.freepressjournal.in