

अदिस अबाबा : इथिओपियामध्ये १२,००० वर्षे शांत असलेल्या ज्वालामुखीचा स्फोट झाला असून त्याचा भारतावरही परिणाम झाला आहे. इथिओपियातील हैली गुब्बी ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि त्यानंतर निर्माण झालेली राख प्रति तास १२० किमी इतक्या वेगाने भारतापर्यंत पोहोचली आहे. ‘इंडियामेटस्काय वेदर’च्या माहितीनुसार, ज्वालामुखीच्या राखेचे ढग सोमवारी रात्री पश्चिम भारतातील काही भागांमध्ये पोहोचले आणि उत्तरेकडील राज्याच्या दिशेने जात आहेत.
ज्वालामुखीच्या स्फोटानंतर १४ किलोमीटर उंच राखेचा ढग तयार झाला असून, या ढगामुळे हवाई सेवेलाही फटका बसला आहे. भारतीय हवामान खात्याने यासंदर्भात सावधगिरीचा इशारा दिला आहे. एका अंदाजानुसार याचा परिणाम गुजरात, दिल्ली-एनसीआर, राजस्थान, पंजाब आणि हरयाणापर्यंत होण्याची शक्यता आहे. ‘इंडियामेटस्काय वेदर’ने याबद्दल म्हटले आहे की, राखेच्या ढगाने गुजरातमधून (भारताच्या पश्चिमेकडून) भारतात प्रवेश केला. रात्री १० वाजता राजस्थान, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा आणि पंजाबच्या दिशेने हे ढग सरकले आणि त्याने हिमालय आणि इतर क्षेत्रातही प्रवेश केला.
ज्वालामुखीच्या राखेत काय?
ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर राखेचे ढग आकाशात पसरले आहेत. हे ढग प्रति तास १०० ते १२० किमी इतक्या वेगाने उत्तर भारताच्या दिशेने सरकले. एका रिपोर्टनुसार, ज्वालामुखीच्या राखेत सल्फर डायऑक्साईड, काच आणि दगडाचे छोटे कण असतात. ‘इंडियामेटस्काय वेदर’ने इशारा दिला आहे की, राखेच्या ढगामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते. म्हणजे राखेच्या धुरक्यामुळे समोरच्या गोष्टी अस्पष्टपणे दिसतील. त्याचबरोबर हवाई वाहतूक विस्कळीत होऊ शकते. राखेचे हे ढग समुद्रसपाटीपासून तब्बल २५,००० ते ४५,००० फूट इतक्या उंचीवरून सरकत आहेत, त्यामुळे त्याचा हवेच्या गुणवत्तेवर काहीही परिणाम होणार नाही. राखेचे काही कण जमिनीवर पडू शकतात, पण त्याचीही शक्यता कमीच आहे, असेही ‘इंडियामेटस्काय वेदर’ने म्हटले आहे.
हवाई वाहतूक प्रभावित
आधी ओमान आणि नंतर येमेनमधील हवाई वाहतूक प्रभावित झाल्यानंतर आता या राखेच्या ढगांमुळे भारतातील हवाई वाहतूक प्रभावित झाली आहे. गुजरातच्या पश्चिम सीमेवरून हे ढग भारतात दाखल झाले. त्यानंतर राजस्थान, दिल्लीमार्गे हिमालयीन पट्ट्यावरून हे ढग आज संध्याकाळी चीनच्या दिशेने जातील. पण तोपर्यंत भारतीय विमान कंपन्यांनी काळजी घेण्याचे निर्देश ‘डीजीसीए’ने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक विमान कंपन्यांनी आपल्या उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. एअर इंडियाने २४ व २५ नोव्हेंबर अशा दोन दिवसांमध्ये मिळून एकूण ११ विमान उड्डाणे रद्द केल्याची माहिती आपल्या ट्विटर हँडलवर दिली आहे.
इथियोपियात काय घडले?
एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, इथियोपियातील अफार भागात असलेल्या हैली गुब्बी ज्वालामुखी रविवारी सकाळी फुटला. त्यामुळे आजूबाजूची गावे धुळीने झाकली गेली आहेत. स्थानिक अधिकारी मोहम्मद सईद यांनी सांगितले की, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण, ज्वालामुखीच्या स्फोटामुळे स्थानिक लोकांवर आर्थिक स्वरुपात परिणाम होऊ शकतो. हैली गुब्बी ज्वालामुखीचा स्फोट झाल्याची यापूर्वीची कोणतीही नोंद नाही.