‘नीट’ परीक्षेतील ०.००१ टक्के निष्काळजीही कारवाईस पात्र; SC चे स्पष्ट मत, गैरप्रकार करून झालेला डॉक्टर समाजासाठी धोकादायक

वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ परीक्षेत ०.००१ टक्के निष्काळजीपणा झाला असल्यास त्याच्यावर कारवाई आवश्यक आहे, असे स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाने सोमवारी व्यक्त केले.
‘नीट’ परीक्षेतील ०.००१ टक्के निष्काळजीही कारवाईस पात्र; SC चे स्पष्ट मत, गैरप्रकार करून झालेला डॉक्टर समाजासाठी धोकादायक
Published on

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ परीक्षेत ०.००१ टक्के निष्काळजीपणा झाला असल्यास त्याच्यावर कारवाई आवश्यक आहे, असे स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाने सोमवारी व्यक्त केले. यंत्रणेला फसवून आणि गैरप्रकार करून झालेला डॉक्टर हा समाजासाठी अत्यंत धोकादायक असून विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ढोर मेहनत घेतली असून ती वाया जाऊ देणार नाही, असेही न्यायालयाने सांगितले.

सुप्रीम कोर्टाचे न्या. विक्रम नाथ व न्या. एसव्हीएन भट्टी यांच्या खंडपीठात ‘नीट’च्या यापूर्वी दाखल झालेल्या विविध याचिकांवर सुनावणी झाली. तसेच मंगळवारी दाखल झालेल्या दोन याचिकांवरही सुनावणी झाली.

खंडपीठाने सांगितले की, यंत्रणेला फसवून झालेला डॉक्टर हा समाजासाठी अधिक धोकादायक असतो. ही परीक्षा घेणारी संस्था म्हणून ‘एनटीए’ची (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) मोठी जबाबदारी आहे. यात क्षुल्लकशी जरी चूक झालेली असल्यास त्याविरोधात कारवाई व्हायला हवी. ‘नीट’बाबत दाखल केलेल्या याचिकांवर ८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तसेच या प्रकरणी केंद्र सरकार व ‘एनटीए’ने आपले म्हणणे दोन आठवड्यांत सादर करावे, असे खंडपीठाने सांगितले.

‘नीट’बाबत पंतप्रधान गप्प का? - राहुल गांधी

‘नीट’ परीक्षेवरून देशभरात सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गप्प का आहेत, असा प्रश्न काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे. या प्रश्नावर आम्ही रस्त्यापासून संसदेपर्यंत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. बिहार, गुजरात व हरयाणात झालेल्या अटकेवरून या परीक्षेत संघटित भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत आहे. भाजपशासित राज्ये ही पेपरफुटीचे केंद्र बनलेली दिसत आहेत, असा आरोप त्यांनी केला. २४ लाख ‘नीट’ परीक्षार्थींचे भवितव्य पणाला लागलेले असताना नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे मौन धारण केले आहे. पण, विरोधी पक्षाची भूमिका म्हणून आम्ही तरुणांसाठी आवाज उठवून सरकारवर दबाव आणणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in