१८ वर्षांवरील सर्वांना शासकीय रुग्णालयात मोफत बूस्टर डोस मिळणार

१८ वर्षांवरील सर्वांना शासकीय रुग्णालयात मोफत बूस्टर डोस मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

येत्या १५ जुलैपासून पुढील ७५ दिवस १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस मोफत मिळणार आहे. २७ सप्टेंबरपर्यंत हा डोस दिला जाऊ शकतो. तसेच हा बूस्टर डोस शासकीय रुग्णालयात उपलब्ध होणार असून सध्या देशात १९९ कोटी लसीचे डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

काही दिवसांपूर्वी सरकारने बूस्टर डोस घेण्याचा कालावधी देखील कमी केला आहे. पूर्वी पहिले दोन डोस घेतल्यानंतर ९ महिन्यांनंतरच एखाद्याला बूस्टर डोस मिळू शकत असे. परंतु, तो कालावधी आता ६ महिन्यांवर आणला आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून कोविडचा प्रतिबंधात्मक डोस वाढवण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत, १८-५९ वयोगटातील ७७ कोटी लोकसंख्येच्या १ टक्क्यापेक्षा कमी लोकांना प्रिकॉशन डोस मिळाला आहे. ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या १६ कोटी लोकसंख्येसह केवळ २६ टक्के आरोग्य सेवा आणि फ्रंटलाइन कामगारांना बूस्टर डोस मिळाला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. यापूर्वी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या आठवड्यात लसीचा दुसरा आणि प्रिकॉशन डोस ९ महिन्यांवरून ६ महिन्यांपर्यंत कमी केला होता. ‘हर घर दस्तक अभियान २.०’ १ जून रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणाला गती देण्यासाठी आणि बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आले. दोन महिन्यांचा हा उपक्रम अद्यापही सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in