पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे निधन

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांचे मंगळवारी निधन झाले.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे निधन

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांचे मंगळवारी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फोनवरून पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेल्या प्रकाशसिंग बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. प्रकाशसिंग बादल यांना गेल्या वर्षी जूनमध्ये गॅस्ट्राइटिस आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविडनंतरच्या आरोग्य तपासणीसाठी त्यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. बादल यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि त्यांना लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकाशसिंग बादल यांच्या पत्नी सुरिंदर कौर यांचेही निधन झाले आहे. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल हे त्यांचे पुत्र आहेत.

प्रकाशसिंग बादल यांचा जन्म ८ डिसेंबर १९२७ रोजी पंजाबमधील अबुल खुराना या छोट्याशा गावात जाट शीख कुटुंबात झाला. त्यांनी लाहोर येथील फॉर्मन ख्रिश्चन कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या राजकीय कारकीर्दीत बादल यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले. १९५२मध्ये ते सर्वाधिक कमी वयाचे सरपंच म्हणून निवडून आले होते. १९७०मध्ये ते पंजाबचे सर्वाधिक कमी वयाचे मुख्यमंत्री बनले होते. वयाच्या ४३व्या वर्षी त्यांनी मुख्यमंत्री होण्याचा मान पटकावला होता. १९७०-७१, १९७७-८०, १९९७-२००२ आणि २००७-२०१७ मध्ये त्यांनी पाच वेळा मुख्यमंत्री बनण्याचा मान पटकावला. त्यानंतर २०१२मध्ये सर्वाधिक वयाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी विक्रम रचला होता.

गेल्या वर्षी झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना आपचे उमेदवार गुरमीत सिंग खुदियान यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. त्याचबरोबर १९७२, १९८० आणि २००२मध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना बादल हे खासदार म्हणूनही निवडून आले होते. त्याचवेळी त्यांच्याकडे केंद्रीय शेती आणि सिंचन मंत्री म्हणून कार्यभार सोपवण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in