ई-सिगारेट बॅन करणाऱ्या IAS अधिकाऱ्याच्या हाती UPSC ची धुरा! कोण आहेत प्रीती सुदान? उद्या स्वीकारणार पदभार

प्रीती सुदान आता १ ऑगस्टपासून मनोज सोनी यांच्या जागी पदभार स्वीकारणार आहेत. मनोज सोनी यांनी कार्यकाळ संपायला जवळपास पाच वर्षे बाकी असताना, गेल्या महिन्यात, "वैयक्तिक कारणास्तव" केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
ई-सिगारेट बॅन करणाऱ्या IAS अधिकाऱ्याच्या हाती UPSC ची धुरा! कोण आहेत प्रीती सुदान? उद्या स्वीकारणार पदभार
Published on

१९८३ च्या बॅचच्या (निवृत्त) IAS अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची UPSC च्या अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. प्रीती सुदान आता उद्या अर्थात १ ऑगस्टपासून मनोज सोनी यांच्या जागी पदभार स्वीकारणार आहेत. मनोज सोनी यांनी कार्यकाळ संपायला जवळपास पाच वर्षे बाकी असताना, गेल्या महिन्यात, "वैयक्तिक कारणास्तव" केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनी यांचा कार्यकाळ २०२९ मध्ये संपणार होता.

सुदान या १९८३ च्या बॅचच्या (निवृत्त) आंध्र प्रदेश केडरच्या IAS अधिकारी आहेत. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी त्या UPSC मध्ये सदस्य म्हणून रुजू झाल्या. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून अर्थशास्त्रात एम.फिल आणि सोशल पॉलिसी अँड प्लॅनिंगमध्ये एम.एस्सी केले आहे. त्या जुलै २०२० मध्ये केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी महिला आणि बाल विकास आणि संरक्षण मंत्रालयातही काम केले आहे.

प्रीती सुदान यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ, आयुष्मान भारत, नॅशनल मेडिकल कमिशन, अलाईड हेल्थ प्रोफेशनल्स कमिशन यांसारख्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. याशिवाय ई-सिगारेटवरील बंदीच्या कायद्याचे श्रेय देखील प्रीती सुदान यांना दिले जाते. त्यांनी जागतिक बँकेत सल्लागार म्हणूनही काम केले आहे.

दरम्यान, प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी बनावट ओळखपत्रे तयार केल्याच्या आरोपांमुळे UPSC वादात सापडली असताना मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. तथापि, सोनी यांचा राजीनाम्याचा निर्णय फसवी प्रमाणपत्रे सादर केल्याचा आरोप असलेल्या UPSC उमेदवारांच्या अलीकडील वादाशी संबंधित नाही, असे सूत्रांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in