माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

लोकसभा निवडणुकीला काही काळ बाकी असताना कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

कोलकाता : लोकसभा निवडणुकीला काही काळ बाकी असताना कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गंगोपाध्याय यांनी सांगितले की, आजचा प्रवेश छान आहे. त्यांनी ज्या प्रकारे माझे स्वागत केले ते जबरदस्त आहे. प्रत्येकाला माहीत आहे की, आपणाला भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे आहे.

गंगोपाध्याय यांनी अलीकडेच न्यायाधीश म्हणून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कोलकाता येथे पक्षाचे प्रदेश प्रमुख सुकांता मजुमदार, विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि इतरांच्या उपस्थितीत औपचारिकपणे पक्षात समावेश करण्यात आला.

पक्षात त्यांचे स्वागत करताना सुकांता मजुमदार म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांचे आमच्या पक्षात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबात स्वागत करतो. त्यांनी ज्या प्रकारे वंचितांसाठी न्यायमूर्ती म्हणून काम केले आहे त्यावर माझा विश्वास आहे. बंगालच्या शोषित पीडितांसाठी ते भाजपच्या नेतृत्वासोबत ते काम पुढे नेतील.

संदेशखळीवर बोलताना गंगोपाध्याय यावेळी म्हणाले की, ही खूप वाईट घटना आहे. राज्याचे नेते तिथे गेले आहेत. त्यांना तिथे पोहोचण्यापासून रोखले आहे. तरीही भाजप नेते पोहोचले आणि तिथल्या महिलांच्या पाठीशी उभे राहिले.

आगामी काळात बंगालच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. बंगालच्या सुशिक्षित तरुणांनी पुढे येण्याची आणि राज्याच्या राजकारणाला चांगले वळण देण्यासाठी योगदान देण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही भाजप नेते म्हणाले. दरम्यान, अभिजीत गंगोपाध्याय यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपवर सोडला आहे. त्यांनी त्या संबंधात कोणतेही संकेत दिले नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in