‘आरओ’ पाण्याचे फॅड जीवघेणे; तज्ज्ञांचे मत : शरीरासाठी आवश्यक खनिजे होतात नष्ट

‘आरओ’चे पाणी शरीरासाठी आरोग्यदायक असते, असा समज आहे. त्यामुळेच लोक घरात महागातील महाग प्युरिफायर लावतात. हेच पाणी आता आरोग्याला घातक बनत असल्याचे निष्कर्ष आहे.
‘आरओ’ पाण्याचे फॅड जीवघेणे; तज्ज्ञांचे मत : शरीरासाठी आवश्यक खनिजे होतात नष्ट

नवी दिल्ली : सध्या स्वच्छ पाणी पिण्यासाठी भारतीय लोक ‘आरओ’चे प्युरिफायर बसवत आहेत. या पाण्यामुळे आपण स्वच्छ पाणी पितो, असे सर्वांना वाटते. आता यातील धक्कादायक बाब तज्ज्ञांनी समोर आणली आहे. हे ‘आरओ’चे पाणी शरीराला हानिकारक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

‘आरओ’चे पाणी शरीरासाठी आरोग्यदायक असते, असा समज आहे. त्यामुळेच लोक घरात महागातील महाग प्युरिफायर लावतात. हेच पाणी आता आरोग्याला घातक बनत असल्याचे निष्कर्ष आहे.

‘आरओ’ यंत्रणेवर आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये तज्ज्ञांनी सांगितले की, ‘आरओ’ प्युरिफायरमधून जेव्हा आपण पाणी स्वच्छ करतो तेव्हा त्या प्रक्रियेत केवळ पाण्यातील घाणीबरोबरच त्यातील खनिजे नष्ट होतात. जेव्हा हे आरओचे पाणी शरीरात जाते तेव्हा ते आरोग्याला हानिकारक होते. हे पाणी शरीरासाठी अनेकदा समस्या निर्माण करते. स्वच्छ केलेल्या पाण्यात प्रतिलिटर २०० ते २५० मिलिग्रॅम खनिजे असली पाहिजेत.

उकळून पाणी पिणे हितावह

नामवंत डॉक्टरांनी सांगितले की, ‘आरओ’द्वारे पाणी फिल्टर केल्याने शरीराला आवश्यक असणारी खनिजे नष्ट होतात. त्यामुळे ‘आरओ’पेक्षा उकळून पाणी पिणे हितावह ठरेल. ‘आरओ’ पाण्यामुळे आवश्यक खनिजे संपुष्टात येत असल्याने तुमच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ शकतो. बाटलीबंद पाणी सतत प्यायल्याने शरीराला हानिकारक असते. ‘आरओ’द्वारे पाणी फिल्टर करताना टीडीएस स्तर ७० ते १५० च्या दरम्यान असणे गरजेचे आहे. सतत ‘आरओ’चे पाणी प्यायल्याने शरीरात ‘बी-१२’ जीवनसत्वे कमी होऊ शकतात. फिल्टरद्वारे पाण्याची स्वच्छता करताना ‘आरओ’ हे पाण्यातील कोबाल्ट दूर करते. हे कोबाल्ट ‘बी-१२’ जीवनसत्व देत असते. पाण्यातील टीडीएस ५०० पेक्षा कमी असल्यास ते पाणी पिण्यासाठी योग्य मानले जाते. यापेक्षा जास्त टीडीएस असल्यास ते शरीरासाठी हानिकारक असते.

जागतिक आरोग्य संघटनेचाही इशारा

जागतिक आरोग्य संघटनेनेही ‘आरओ फिल्टर’च्या वापराबाबत यापूर्वीच इशारा दिला आहे. २०१९ मध्ये संघटनेने सांगितले होते की, ‘आरओ फिल्टर’ पाणी स्वच्छ करते. मात्र, त्यातील कॅल्शियम व मॅग्नेशियम नष्ट करतात. ही खनिजे शरीरात ऊर्जा निर्माण करायला फार गरजेची आहेत. पिण्याच्या पाण्यातील टीडीएस ३०० मिलिग्रॅमपेक्षा कमी असले पाहिजे, तर टीडीएसचा स्तर ९०० पेक्षा अधिक असल्यास ते पाणी कधीही पिऊ नये.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in