गुजरातच्या बनासकांठामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; २१ ठार, ५ जखमी

गुजरातच्या बनासकांठामध्ये मंगळवारी सकाळी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन आग लागल्याने २१ कामगार ठार, तर पाच जण जखमी झाल्याची घटना घडली.
गुजरातच्या बनासकांठामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; २१ ठार, ५ जखमी
Published on

पालनपूर : गुजरातच्या बनासकांठामध्ये मंगळवारी सकाळी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन आग लागल्याने २१ कामगार ठार, तर पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. हा स्फोट इतका भीषण होता की, त्यामुळे कारखान्याचे संपूर्ण बांधकाम कोसळले. त्यामुळे त्याखाली अडकून आणखी काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

बनासकांठा येथील डीसा ‘जीआयडीसी’मध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत २१ जणांचामृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासह ‘एसडीआरएफ’चे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. स्फोटानंतर कारखान्याचा काही भाग कोसळला. स्फोटानंतर भिंती आणि छत कोसळल्याने अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

फटाके तयार करण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला. स्फोटात मृत्युमुखी पडलेले सर्व मजूर मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक स्फोट झाल्याने मजुरांना पळता आले नाही. हा स्फोट इतका भीषण होता की, अनेक कामगारांच्या शरीराचे अवयव दूरवर फेकले गेले. कारखान्याच्या पाठीमागील शेतात मृतांच्या शरीराचे काही भाग आढळून आले.

दरम्यान, मंगळवारी सकाळी आम्हाला डीसा येथील औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. या घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला. चार जखमी कामगारांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोट इतका मोठा होता, की कारखान्याचा स्लॅब कोसळला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती बनासकांठाचे जिल्हाधिकारी मिहीर पटेल यांनी दिली.

आर्थिक मदत जाहीर

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जारी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in